घरक्रीडाTokyo Olympics : शाब्बास सिंधू!

Tokyo Olympics : शाब्बास सिंधू!

Subscribe

ऑलिम्पिकमध्ये दोनदा पदक जिंकणारी सिंधू भारताची पहिलीच महिला खेळाडू ठरली.

पी. व्ही. सिंधू…हे नाव आता भारतीय क्रीडा इतिहासात सोनेरी अक्षरात लिहिले जाणार आहे. भारताची ‘फुलराणी’ सिंधूने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई करतानाच इतिहास रचला. २०१६ साली रिओमध्ये रौप्य आणि आता टोकियोमध्ये कांस्य असे दोनदा ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती भारताची पहिलीच महिला खेळाडू ठरली. मागील ऑलिम्पिकमध्ये सिंधूकडून तशी कोणाला पदकाची अपेक्षा नव्हती. त्यामुळे तिने रौप्यपदक जिंकल्याने भारतीयांना आश्चर्याचा सुखद धक्का बसला होता. परंतु, यंदाचे चित्र वेगळे होते.

रिओ ऑलिम्पिकच्या वेळी सिंधू आणि सायना नेहवाल यांच्यापैकी भारताची सर्वोत्तम बॅडमिंटनपटू कोण? असा चाहत्यांना प्रश्न पडत होता. आता मात्र सायनाला बरेच मागे सोडत सिंधू पुढे निघून गेली आहे. त्यामुळे यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये तिने पदक जिंकल्याने कोणालाही आश्चर्य वाटले नाही किंवा धक्का बसला नाही. धक्का बसलाच असेल, तर तो हाच की सिंधूच्या हातून सुवर्णपदक कसे निसटले याचा!

- Advertisement -

भारताला दिनेश खन्ना, प्रकाश पदुकोण, पुलेला गोपीचंद यांसारख्या महान बॅडमिंटनपटूंचा वारसा लाभला आहे. त्यानंतर सायना, सिंधू, श्रीकांत, साई प्रणित असे प्रतिभावान खेळाडू भारताला मिळाले. या बॅडमिंटनपटूंनी भारतीयांना अभिमान वाटावा अशी कामगिरी केली. मात्र, सिंधूने तिचा स्तर हा इतर भारतीय बॅडमिंटनपटूंपेक्षा वेगळा असल्याचे मागील काही वर्षांमध्ये वारंवार दाखवून दिले आहे.

भारतीय खेळाडू बरेचदा महत्त्वाच्या सामन्यांत खूप दडपण घेतात आणि मग त्यांची कामगिरी खालावते अशी टीका केली जाते. सिंधू मात्र याला अपवाद आहे. सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक पटकावले. तिला एशियाड, राष्ट्रकुल स्पर्धा, आशियाई बॅडमिंटन स्पर्धा अशा सर्वच स्पर्धांमध्ये पदक जिंकण्यात यश आले. परंतु, ऑलिम्पिक वगळता तिच्या कारकिर्दीतील सर्वात मोठे यश हे २०१९ सालच्या जागतिक स्पर्धेत आले.

- Advertisement -

सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहाराचा पराभव करत जागतिक स्पर्धा जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली होती. या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी ती पहिलीच भारतीय बॅडमिंटनपटू ठरली होती. टोकियो ऑलिम्पिकमध्ये अशीच ‘सुवर्ण’ कामगिरी करण्याचे सिंधूचे लक्ष्य होते. मात्र, उपांत्य फेरीतील ताई झू यिंगविरुद्धच्या पराभवामुळे तिचे हे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. परंतु, सिंधूने हार मानली नाही.

मुळात हार मानणे सिंधूला जमतही नाही. तिने २०१९ मध्ये जागतिक स्पर्धा जिंकली खरी, पण त्याआधी दोन वेळा तिला रौप्य आणि दोन वेळा कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते. सिंधूला आता ऑलिम्पिकमध्येही एकदा रौप्य आणि एकदा कांस्यपदक जिंकण्यात यश आले आहे. पुन्हा तिच्यापुढे एक शेवटचा अडथळा आहे. त्यामुळे २०२४ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ‘सुवर्ण’ कामगिरी करण्यासाठी सिंधू पूर्णपणे सज्ज असेल, याची खात्री बाळगायला हरकत नाही.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -