Monday, September 20, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा Tokyo Olympics : सिंधूचा पराभव, पदकाची संधी मात्र कायम! कमलप्रीत कौर फायनलमध्ये

Tokyo Olympics : सिंधूचा पराभव, पदकाची संधी मात्र कायम! कमलप्रीत कौर फायनलमध्ये

बॅडमिंटनमध्ये निराशा झाली असली तरी अ‍ॅथलेटिक्स आणि हॉकीमध्ये भारतासाठी शनिवारचा दिवस यश देणारा ठरला. 

Related Story

- Advertisement -

‘आज माझा दिवस नव्हता,’ अशा शब्दांत भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने महिला एकेरीच्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर उद्गार काढले. सिंधूला यंदाच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदकाची दावेदार मानले जात होते. मात्र, ताई झू यिंगविरुद्ध शनिवारी झालेल्या सामन्यात १८-२१, १२-२१ असा पराभव झाल्याने सिंधूचे ‘सुवर्ण’ कामगिरीचे स्वप्न पूर्ण होऊ शकणार नाही. आता रविवारी तिला कांस्यपदकासाठी झुंजावे लागणार आहे. बॅडमिंटनमध्ये भारताची निराशा झाली असली तरी अ‍ॅथलेटिक्स आणि हॉकीमध्ये भारतासाठी शनिवारचा दिवस यश देणारा ठरला.

थाळीफेकमध्ये कमलप्रीत कौरने ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी केली. थाळीफेक क्रीडा प्रकाराच्या पात्रता फेरीत कमलप्रीतने ६४ मीटर लांब अंतराची नोंद करत अंतिम फेरीत धडक मारली. पात्रता फेरीतील दोन थाळीफेकपटूंना थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळाला आणि यात कमलप्रीतचा समावेश होता. आता या स्पर्धेची अंतिम फेरी २ ऑगस्टला रंगणार आहे. त्याचप्रमाणे भारतीय महिला हॉकी संघाला तब्बल ४१ वर्षांनंतर उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करण्यात यश आले.

- Advertisement -

भारतीय संघाने शनिवारी झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ४-३ अशी मात केली. या सामन्यात स्ट्रायकर वंदना कटारियाने चौथ्या, १७ व्या आणि ४९ व्या मिनिटाला गोल केले. त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये हॅटट्रिकची नोंद करणारी ती पहिली महिला हॉकीपटू ठरली. पहिले तीन साखळी सामने गमावणाऱ्या भारताने अखेरच्या दोन सामन्यांत आयर्लंड आणि दक्षिण आफ्रिकेला पराभूत केले. तसेच ग्रेट ब्रिटनने आयर्लंडवर २-० अशी मात केल्याने भारतीय महिला हॉकी संघाचा उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेश निश्चित झाला.

बॉक्सिंग, तिरंदाजी, नेमबाजीत निराशा

पूजा राणी (७५ किलो) आणि अमित पांघल (५२ किलो) या भारताच्या बॉक्सर्सना शनिवारी पराभवाचा सामना करावा लागला. पूजा राणीला उपांत्यपूर्व फेरीतील सामना जिंकत पदक निश्चित करण्याची संधी होती. मात्र, त्यात तिला अपयश आले. तर अमित पांघल उप-उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाला. त्याचप्रमाणे भारताचा तिरंदाज अतानू दासलाही उप-उपांत्यपूर्व फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. महिलांच्या ५० मीटर थ्री-पोझिशन नेमबाजी प्रकारात अंजुम मुद्गिल आणि तेजस्विनी सावंत या पात्रता फेरीचा अडथळा पार करू शकल्या नाहीत.

- Advertisement -