घरक्रीडाTokyo Olympics : हार कर जीतने वाले को...

Tokyo Olympics : हार कर जीतने वाले को…

Subscribe

सात्विक आणि चिरागचे टोकियो ऑलिम्पिकमधील आव्हान मंगळवारी संपुष्टात आले. मात्र, त्यांनी त्यांच्या कामगिरीमुळे चाहत्यांची मने नक्कीच जिंकली.

‘हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं,’ हे बाजीगर चित्रपटातील वाक्य भारताचे युवा बॅडमिंटनपटू सात्विकसाईराज रणकिरेड्डी आणि चिराग शेट्टी यांच्यासाठी अगदी योग्य लागू पडते. सात्विक आणि चिरागचे टोकियो ऑलिम्पिकमधील आव्हान मंगळवारी संपुष्टात आले. तीन पैकी दोन साखळी सामने जिंकल्यानंतरही भारताच्या या जोडीवर स्पर्धेबाहेर होण्याची नामुष्की ओढवली. मात्र, त्यांनी त्यांच्या कामगिरीमुळे चाहत्यांची मने नक्कीच जिंकली. सात्विक आणि चिराग या राष्ट्रकुल स्पर्धांमधील रौप्यपदक विजेत्या जोडीचे हे ऑलिम्पिकमधील पदार्पण होते. त्यांनी दमदार सुरुवात करताना जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या ली यांग आणि ची-लिन वांग या चिनी तैपेईच्या जोडीला पराभवाचा धक्का दिला होता. परंतु, दुसऱ्या सामन्यात त्यांना सर्वोत्तम खेळ करता आला नाही.

जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या केविन संजया सुका आणि मार्कस फेर्नांल्दी गिडेऑन या इंडोनेशियाच्या जोडीने सात्विक आणि चिरागचा १३-२१, १२-२१ असा पराभव केला. दोन्ही गेममध्ये सात्विक आणि चिरागला सुका आणि गिडेऑनवर दबाव टाकण्याची संधी होती. परंतु, त्यांनी काही चुका केल्या आणि या चुका अखेर त्यांना महागात पडल्या. परंतु, त्यांनी अव्वल सीडेड जोडीला दिलेल्या झुंजीचे कौतुक झालेच पाहिजे. पहिल्या दोन सामन्यांत एक विजय आणि एक पराभव या कामगिरीमुळे तिसऱ्या सामन्यात त्यांना विजय मिळवणे जवळपास अनिवार्यच होते. परंतु, या गोष्टीचे त्यांनी फारसे दडपण घेतले नाही.

- Advertisement -

अखेरच्या साखळी सामन्यात सात्विक आणि चिरागने इंग्लंडच्या बेन लेन आणि सिन वॅण्डी या जोडीवर विजय मिळवला. मात्र, त्याचवेळी इंडोनेशियाच्या जोडीने चिनी तैपेईच्या जोडीला अनपेक्षितरित्या पराभूत केले आणि सात्विक-चिराग जोडीचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले. मुळात सात्विक आणि चिरागला बाद फेरी गाठणे अवघड जाणार हे अपेक्षितच होते. याचे कारण म्हणजे, त्यांच्याच गटात जागतिक क्रमवारीतील अव्वल आणि तिसऱ्या स्थानावरील जोड्यांचा समावेश होता. त्यामुळे ऑलिम्पिक पदार्पणात, इतक्या अवघड गटात तीन पैकी दोन साखळी सामने जिंकणे ही नक्कीच कौतुकास्पद गोष्ट म्हणावी लागेल.

आंध्रचा सात्विक आणि मुंबईकर चिराग यांची जोडी जमवली, ती म्हणजे भारताचे माजी प्रशिक्षक टॅन किम हर यांनी! मलेशियन टॅन यांना हे उंचपुरे, साधारण खेळण्याची एकसारखीच पद्धत असलेले दोन खेळाडू एकत्र खेळताना यशस्वी होतील याची खात्री होती. मात्र, सात्विक आणि चिरागला सुरुवातीला काही आव्हानांना सामोरे जावे लागले, पण त्यावर त्यांनी मात केलीच. त्यांनी सातत्याने चांगला खेळ करण्यास आणि स्पर्धा जिंकण्यास सुरुवात केली. दोन वर्षांच्या कालावधीत त्यांनी हैदराबाद ओपन, सय्यद मोदी, थायलंड ओपन आणि फ्रेंच ओपन अशा चार मोठ्या स्पर्धा जिंकल्या.

- Advertisement -

याच दरम्यान २०१८ राष्ट्रकुल स्पर्धेतही या दोघांना कांस्यपदक जिंकण्यात यश आले. त्यांनी पुढे दमदार खेळ सुरु ठेवत ऑलिम्पिक पदार्पण केले आणि पहिल्याच प्रयत्नात जागतिक क्रमवारीतील तिसऱ्या क्रमांकाच्या जोडीला पराभूत केले. या कामगिरीमुळे आता त्यांच्याकडून चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या असून त्यांचे आणि त्यांच्यामुळे भारताचे बॅडमिंटनमध्ये भविष्य उज्ज्वल आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -