Tokyo Olympics : सात्विक-चिरागची विजयी सलामी; चिनी तैपेईच्या जोडीला दिला धक्का

सात्विक आणि चिराग या जोडीचे हे ऑलिम्पिकमधील पदार्पण होते.

satwiksairaj rankireddy and chirag shetty
सात्विकसाईराज रणकिरेड्डी आणि चिराग शेट्टी

सात्विकसाईराज रणकिरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारताच्या बॅडमिंटन पुरुष दुहेरीतील आघाडीच्या जोडीने टोकियो ऑलिम्पिकमध्ये विजयी सलामी दिली. सात्विक आणि चिरागने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या यांग ली आणि ची-लिन वांग या चिनी तैपेईच्या जोडीला पराभवाचा धक्का दिला. राष्ट्रकुल स्पर्धांमधील रौप्यपदक विजेत्या सात्विक आणि चिराग या जोडीचे हे ऑलिम्पिकमधील पदार्पण होते. त्यांना पहिल्या फेरीतील सामना २१-१६, १६-२१, २७-२५ असा जिंकण्यात यश आले.

यांग ली आणि ची-लिन वांग या चिनी तैपेईच्या जोडीने यावर्षाच्या सुरुवातीला थायलंड ओपन व बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूर फायनल्स या दोन स्पर्धा जिंकल्या होत्या. त्यामुळे ऑलिम्पिकमधील सलामीच्या लढतीत त्यांचे पारडे जड मानले जात होते. परंतु, सात्विक आणि चिरागने त्यांना पराभवाचा धक्का दिला. या सामन्याच्या पहिल्या लढतीत सात्विक आणि चिरागने आक्रमक सुरुवात करताना ७-२ अशी आघाडी मिळवली. भारताच्या या जोडीने पुढेही चांगला खेळ सुरु ठेवत पहिला गेम २१-१६ असा जिंकला.

दुसऱ्या गेममध्ये मात्र अपेक्षेप्रमाणे चिनी तैपेईच्या जोडीने दमदार पुनरागमन करत हा गेम २१-१६ असा जिंकला. तिसऱ्या गेममध्ये दोन्ही जोड्यांनी झुंजार खेळ केला. त्यामुळे या गेममध्ये १०-१० अशी बरोबरी झाली होती. त्यानंतर सात्विक आणि चिरागने काही चुका केल्याने ते १४-१७ असे पिछाडीवर पडले. त्यानंतर मात्र त्यांनी आपला खेळ उंचावत सामन्यात २०-२० अशी आणि २४-२४ अशी बरोबरी केली. अखेर त्यांनी तिसरा गेम २७-२५ असा जिंकत सामन्यात बाजी मारली.

साई प्रणित पराभूत 

भारताच्या साई प्रणितला मात्र पराभवाचा सामना करावा लागला. पुरुष एकेरीतील पहिल्या साखळी सामन्यात साई प्रणितला इस्राईलच्या मिशा झिलबर्मानने १७-२१, १५-२१ असे सरळ गेममध्ये पराभूत केले. परंतु, प्रणितचे आव्हान अजून संपुष्टात आलेले नाही. २०१९ साली जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावणाऱ्या प्रणितपुढे दुसऱ्या साखळी सामन्यात हॉलंडच्या मार्क काल्योवचे आव्हान असेल.