Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा Tokyo Olympics : वंदना कटारियाची ऐतिहासिक हॅटट्रिक; महिला हॉकी संघ विजयी

Tokyo Olympics : वंदना कटारियाची ऐतिहासिक हॅटट्रिक; महिला हॉकी संघ विजयी

कटारिया ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये हॅटट्रिकची नोंद करणारी पहिली महिला हॉकीपटू ठरली.

Related Story

- Advertisement -

स्ट्रायकर वंदना कटारियाने केलेल्या ऐतिहासिक हॅटट्रिकच्या जोरावर भारतीय महिला हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये शनिवारी झालेल्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर ४-३ असा विजय मिळवला. सुरुवातीचे तिन्ही सामने गमावणाऱ्या भारताचा हा सलग दुसरा विजय ठरला. त्यामुळे त्यांनी उपांत्यपूर्व फेरीच्या आशा कायम राखल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना वंदना कटारियासाठी खास ठरला. तिने या सामन्यात चौथ्या, १७ व्या आणि ४९ व्या मिनिटाला गोल केले. त्यामुळे ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये हॅटट्रिकची नोंद करणारी ती पहिली महिला हॉकीपटू ठरली. भारताचा चौथा गोल युवा खेळाडू नेहा गोयलने केला.

भारत चौथ्या स्थानावर 

उपांत्यपूर्व फेरीतील प्रवेशाच्या आशा कायम राखण्यासाठी भारतीय महिला संघाला हा सामना जिंकणे अनिवार्य होते. भारतीय संघ आता पाच सामन्यांत चार गुणांसह ‘अ’ गटात चौथ्या स्थानी आहे. परंतु, भारताला मागे टाकण्याची आयर्लंडला अजूनही संधी आहे. त्यामुळे अखेरच्या साखळी सामन्यात ग्रेट ब्रिटनने आयर्लंडला पराभूत केल्यास किंवा बरोबरी रोखल्यास भारतीय संघ स्पर्धेत आगेकूच करेल. दोन्ही गटांतील अव्वल चार संघ उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करणार आहेत.

बचावात सुधारणा गरजेची 

- Advertisement -

‘हा सामना जिंकणे सोपे नव्हते. दक्षिण आफ्रिकेने आम्हाला चांगली झुंज दिली. त्यांना संधीचे गोलमध्ये रूपांतर करण्यात यश आले. त्यामुळे बचावात आम्ही आणखी बरीच सुधारणा करू शकतो,’ असे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या विजयानंतर भारताची कर्णधार राणी रामपाल म्हणाली. तसेच भारताचे प्रशिक्षक जोर्द मरीनही भारताने ज्याप्रकारे बचाव केला, त्याबाबत खुश नव्हते. ‘आम्ही प्रतिस्पर्धी संघाला सहज गोल करू दिले. तसेच आम्हाला आणखी गोल मारता आले असते. परंतु, आम्ही हा सामना जिंकणे सर्वात महत्त्वाचे होते आणि ते आम्ही केले,’ असे मरीन यांनी सांगितले.

- Advertisement -