घरक्रीडाTokyo Olympics : पुरुष हॉकी संघाच्या ऐतिहासिक यशाला देशवासियांचा सलाम; पंतप्रधान मोदींनीही केले कौतुक

Tokyo Olympics : पुरुष हॉकी संघाच्या ऐतिहासिक यशाला देशवासियांचा सलाम; पंतप्रधान मोदींनीही केले कौतुक

Subscribe

भारतीय पुरुष हॉकी संघाच्या ऐतिहासिक कामगिरीचे देशभरातून कौतुक झाले.

भारतीय पुरुष हॉकी संघाने ४१ वर्षांपासूनचा ऑलिम्पिक स्पर्धांतील पदकांचा दुष्काळ गुरुवारी संपवला. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत भारताने जर्मनीचा ५-४ असा पराभव केला. भारतीय पुरुष हॉकी संघाने १९८० सालापर्यंत ऑलिम्पिकमध्ये तब्बल आठ वेळा सुवर्णपदक जिंकले होते. त्यानंतरच्या चार दशकांत मात्र भारतीय संघाची कामगिरी खालावली. यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये मनप्रीत सिंगच्या संघाला पदकासाठी प्रबळ दावेदार मानले जात होते. या संघाने सुरुवातीपासूनच दमदार कामगिरी करत कांस्यपदक आपल्या नावे केले. भारतीय पुरुष हॉकी संघाच्या या ऐतिहासिक कामगिरीचे देशभरातून कौतुक झाले.

‘ऐतिहासिक. हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या कायम लक्षात राहील. कांस्यपदक जिंकल्याबद्दल आपल्या पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन. या यशामुळे, भारतीय संघाने संपूर्ण देशाचे आणि विशेषतः युवकांचे लक्ष आपल्याकडे ओढवून घेतले आहे. भारताला आपल्या हॉकी संघाचा अभिमान आहे,’ असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय पुरुष हॉकी संघाचे कौतुक केले.

- Advertisement -

तसेच भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरनेही भारतीय हॉकी संघाचे अभिनंदन केले. ‘भारतासाठी कांस्यपदक जिंकल्याबद्दल हॉकी संघातील प्रत्येक सदस्याचे खूप अभिनंदन. उत्कृष्ट लढा देत हा विजय साजरा केला. अखेरच्या मिनिटांत गोलरक्षक श्रीजेशने ज्याप्रकारे पेनल्टी कॉर्नर अडवला, ते फारच उत्कृष्ट होते. संपूर्ण देशाला तुमचा अभिमान आहे,’ असे सचिनने ट्विटमध्ये लिहिले.

- Advertisement -

केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर हे भारतीय संघाचे कौतुक करताना म्हणाले, ‘तुम्ही करून दाखवले. आता शांत बसवत नाही. आपल्या पुरुष हॉकी संघाने वर्चस्व गाजवले आणि स्वतःच्या दमदार कामगिरीने पुन्हा एकदा ऑलिम्पिक इतिहासात स्वतःचे नाव कोरले. आम्हाला तुमचा अभिमान आहे.’

ओडिशा सरकारने पुरुष आणि महिला या दोन्ही हॉकी संघांना खूप मोठी मदत केली आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांना पुरुष हॉकी संघाच्या कामगिरीचा अभिमान होता. ‘उत्कृष्ट विजय मिळवून तब्बल ४१ वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्याबद्दल भारतीय पुरुष हॉकी संघाचे अभिनंदन. टोकियो ऑलिम्पिकमध्ये मिळवलेला हा ऐतिहासिक विजय आहे आणि यातून अनेक पिढ्यांतील क्रीडापटूंना प्रेरणा मिळेल. पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा,’ असे पटनाईक म्हणाले.

तसेच भारताच्या अन्य क्रीडापटूंनीही भारतीय संघाचे कौतुक आणि अभिनंदन केले.

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -