घरक्रीडाTokyo Olympics : 'अविश्वसनीय कामगिरी'! भारतीय महिला हॉकी संघावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव

Tokyo Olympics : ‘अविश्वसनीय कामगिरी’! भारतीय महिला हॉकी संघावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव

Subscribe

भारतीय महिला हॉकी संघाने पहिल्यांदाच ऑलिम्पिकची उपांत्य फेरी गाठण्याची ऐतिहासिक कामगिरी केली.

भारतीय हॉकीसाठी यंदाचे ऑलिम्पिक यशदायी ठरले आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने दमदार कामगिरी सुरु ठेवताना तब्बल ४९ वर्षांनंतर ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यापाठोपाठ सोमवारी महिला संघाने पहिल्यांदाच ऑलिम्पिकची उपांत्य फेरी गाठण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत राणी रामपालच्या भारतीय संघाने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाला पराभवाचा धक्का दिला. ड्रॅग फ्लिकर गुर्जित कौरने पेनल्टी कॉर्नरवर केलेल्या गोलमुळे भारताने हा सामना १-० असा जिंकला. भारतीय महिला हॉकी संघाच्या या विक्रमी विजयानंतर देशभरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला.

‘उत्कृष्ट कामगिरी! भारतीय महिला हॉकी संघ प्रत्येक विजयासह इतिहास रचत आहे. ऑस्ट्रेलियाला पराभूत करत आपण पहिल्यांदा ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यामुळे १३० कोटी भारतीय आता भारतीय महिला संघाला ‘आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’ असा संदेश देत आहेत,’ असे म्हणत केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी महिला हॉकी संघाचे कौतुक केले.

- Advertisement -

‘भारताचे स्वप्न आता सत्यात उतरत आहे. आपल्या महिला हॉकी संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. भारताच्या पुरुष आणि महिला या दोन्ही हॉकी संघांनी टोकियो ऑलिम्पिकची उपांत्य फेरी गाठली आहे. माझा उत्साह आणि आनंद मी शब्दात मांडू शकत नाही,’ असे भारताचे माजी क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी ट्विटमध्ये लिहिले.

‘या महिलांनी करून दाखवलेच! त्यांनी अविश्वसनीय कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियाला १-० असे पराभूत करत भारतीय महिला हॉकी संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे,’ असे भारताची कुस्तीपटू साक्षी मलिक म्हणाली. साक्षीसह भारताच्या अन्य आजी-माजी खेळाडूंनीही भारतीय महिला हॉकी संघाचे अभिनंदन केले.

- Advertisement -

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -