घरक्रीडाTokyo Olympics : भारताची कुस्तीपटू सोनम मलिक पदार्पणाच्या लढतीत पराभूत

Tokyo Olympics : भारताची कुस्तीपटू सोनम मलिक पदार्पणाच्या लढतीत पराभूत

Subscribe

सोनमचे ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले आहे.

भारताची युवा कुस्तीपटू सोनम मलिकला ऑलिम्पिक पदार्पणात पराभव पत्करावा लागला. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांतील ६२ किलो वजनी गटाच्या पहिल्या फेरीत सोनमला मंगोलियाच्या बोलोरतुया खुरेलखुने पराभूत केले. या लढतीत आघाडी घेतल्यानंतर सोनमने बचावत्मक खेळ केला. त्यामुळे खुरेलखुला आक्रमक खेळ करण्याची संधी मिळाली आणि तिने लढत जिंकली. या लढतीत अखेरची ३५ मिनिटे शिल्लक असेपर्यंत १९ वर्षीय सोनमकडे २-० अशी आघाडी होती. परंतु, आशियाई स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या खुरेलखुने सोनमला गादीवर लोळवत सामन्यात २-२ अशी बरोबरी केली. ही बरोबरी अखेरपर्यंत कायम राहिली. परंतु, खुरेलखुने अखेरचे गुण मिळवल्याने तिला विजेती म्हणून घोषित करण्यात आले.

सोनमचे ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात

खुरेलखुचा पुढील लढतीत माजी विश्वविजेत्या आणि दुसऱ्या सीडेड बल्गेरियाच्या तायेब मुस्तफा युसेनने पराभव केला. तिच्या या पराभवामुळे सोनमचे ऑलिम्पिकमधील आव्हान संपुष्टात आले. ‘सोनमने बोलोरतुविरुद्ध दर्जेदार खेळ केला. मात्र, आघाडी असल्याने तिने बचावात्मक खेळ करण्यास सुरुवात केली आणि इथेच ती चुकली. परंतु, तिला आता मोठ्या आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा अनुभव आहे, असे सोनमचे प्रशिक्षक अजमेर मलिक म्हणाले.

- Advertisement -

अखेरचे गुण मिळवल्याने लढत जिंकली

सोनम आणि खुरेलखु यांच्यातील लढतीत दोन्ही खेळाडूंना आक्रमणात चांगला खेळ करता आला नाही. अखेर सोनमने गुण मिळवत १-० अशी आघाडी घेतली. तिनेच पुन्हा गुण जिंकत आघाडी दुप्पट केली. सोनमने चांगला बचाव करत बराच काळ खुरेलखुला गुण मिळवण्यापासून रोखले. परंतु, खुरेलखुने सोनमचा पाय पकडत तिला गादीवर पाडले आणि दोन गुणांची कमाई करत लढतीत बरोबरी केली. यानंतर दोन्ही खेळाडू गुण मिळवू शकल्या नाहीत. मात्र, अखेरचे गुण खुरेलखुने मिळवल्याने तिने ही लढत जिंकली.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -