घरक्रीडाTokyo Paralympics : भारतीयांचे दुहेरी 'सुवर्ण' यश; पॅरालिम्पिकमध्ये एकाच दिवशी पाच पदके

Tokyo Paralympics : भारतीयांचे दुहेरी ‘सुवर्ण’ यश; पॅरालिम्पिकमध्ये एकाच दिवशी पाच पदके

Subscribe

भारताला पॅरालिम्पिकमध्ये सोमवारी दोन सुवर्णांसह तब्बल पाच पदके जिंकण्यात यश आले.

भारतीय खेळाडूंनी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये (Tokyo Paralympics) रविवार पाठोपाठ सोमवारीही दमदार कामगिरी सुरु ठेवली. भारताला पॅरालिम्पिकमध्ये सोमवारी दोन सुवर्णांसह तब्बल पाच पदके जिंकण्यात यश आले. सुमित अँटीलने पुरुषांच्या एफ-६४ भालाफेक प्रकारात तब्बल तीन वेळा जागतिक विक्रम मोडीत काढत सुवर्णपदक आपल्या नावे केले. तसेच आर-२ महिला १० मीटर एअर रायफल नेमबाजी प्रकारात भारताच्या अवनी लेखराने सुवर्णपदक जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये सुवर्ण कामगिरी करणारी ती भारताची पहिली महिला खेळाडू ठरली.

तीन वेळा मोडला जागतिक विक्रम 

काही आठवड्यांपूर्वी झालेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने सुवर्णपदक पटकावले होते. त्याच्याप्रमाणेच हरयाणाचा रहिवासी असलेल्या सुमित अँटीलने नीरजच्या कामगिरीतून प्रेरणा घेत पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावले. २०१५ मध्ये झालेल्या मोटारसायकल अपघातात सुमितला डाव्या पायाच्या गुडघ्याखालचा भाग गमवावा लागला होता. मात्र, त्याने जिद्दीने भालाफेकीत उत्कृष्ट खेळ केला. त्याने पाचव्या प्रयत्नात ६८.५५ मीटर अंतराची नोंद करत सुवर्णपदक पटकावतानाच जागतिक विक्रमही प्रस्थापित केला. इतकेच नाही, तर याच स्पर्धेत त्याने त्याने तब्बल तीन वेळा जागतिक विक्रम मोडला.

- Advertisement -

सुवर्णपदक जिंकणारी भारताची पहिली महिला

त्याआधी दिवसाच्या सुरुवातीलाच नेमबाज अवनी लेखराने भारताला यंदाच्या पॅरालिम्पिक स्पर्धांतील पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. जयपूरच्या १९ वर्षीय अवनीने २४९.६ गुणांसह आर-२ महिला १० मीटर एअर रायफल नेमबाजी प्रकारात अव्वल क्रमांक पटकावला. तसेच तिने पॅरालिम्पिक स्पर्धांतील विक्रमाशी बरोबरी केली. पॅरालिम्पिक स्पर्धांत सुवर्णपदक जिंकणारी ती भारताची पहिली महिला आणि नेमबाज ठरली. ‘मी माझ्या भावना शब्दांत मांडू शकत नाही. पॅरालिम्पिकमध्ये नेमबाजीत भारताला पहिले पदक जिंकवून दिल्याचा आनंद आहे,’ असे अवनी म्हणाली.

झांझरियाला रौप्य, गुर्जरला कांस्य  

देवेंद्र झांझरिया आणि सुंदर सिंह गुर्जर यांनी एफ-४६ भालाफेक प्रकाराच्या अंतिम फेरीत अनुक्रमे रौप्य आणि कांस्यपदक जिंकले. याआधी दोन वेळा सुवर्णपदक जिंकणाऱ्या झांझरियाला यावेळी अव्वल क्रमांक मिळवता आला नाही. परंतु, त्याने ६४.३५ मीटर अंतराची नोंद करत रौप्यपदक पटकावले. तर गुर्जरला ६४.०१ मीटर लांब भालाफेक केल्याने कांस्यपदक जिंकण्यात यश आले. थाळीफेकीत योगेश काथूनियाने रौप्यपदक जिंकल्याने भारताला एकाच दिवशी पाच पदके मिळाली. भारताला आतापर्यंत आठ पदके मिळाली असून ही भारताची पॅरालिम्पिक स्पर्धांतील सर्वोत्तम कामगिरी आहे.

- Advertisement -

हेही वाचा – थाळीफेकपटू विनोद कुमारने ‘या’ कारणाने कांस्यपदक गमावले


 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -