घरक्रीडाTokyo Paralympics : भाविना पटेलची पुन्हा ऐतिहासिक कामगिरी; फायनलमध्ये प्रवेश

Tokyo Paralympics : भाविना पटेलची पुन्हा ऐतिहासिक कामगिरी; फायनलमध्ये प्रवेश

Subscribe

रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीत भाविनासमोर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या चीनच्या यिंग झोऊचे आव्हान असेल.

भारताची पॅरा टेबल टेनिसपटू भाविना पटेलने (Bhavina Patel) टोकियो पॅरालिम्पिक (Tokyo Paralympics) स्पर्धेत पुन्हा ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भाविनाने चीनच्या मिओ झांगचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. पॅरालिम्पिकमध्ये टेबल टेनिस स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी ती भारताची पहिलीच महिला खेळाडू ठरली. ३४ वर्षीय भाविनाने पॅरालिम्पिकमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीने भारतीय पथकालाही सुखद धक्का बसला आहे. तिने महिला एकेरी क्लास ४ च्या उपांत्य फेरीत झांगवर ३-२ अशी मात केली. आता रविवारी होणाऱ्या अंतिम फेरीत भाविनासमोर जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या चीनच्या यिंग झोऊचे आव्हान असेल.

झांगविरुद्ध ११ सामन्यांत पहिलाच विजय

भाविनाला उपांत्य फेरीतील सामन्याच्या सुरुवातीला चांगला खेळ करता आला नाही. त्यामुळे तिने पहिला गेम गमावला होता. यानंतर मात्र तिने दमदार पुनरागमन करत पुढील दोन्ही गेम जिंकत या सामन्यात २-१ अशी आघाडी मिळवली. झांगने अपेक्षेनुसार खेळ उंचावत चौथा गेम जिंकला. परंतु. पाचव्या गेममध्ये भाविनाने आक्रमक सुरुवात करताना ५-० अशी आघाडी मिळवली. झांगने पुन्हा प्रतिहल्ला करताना भाविनाची आघाडी ८-९ अशी कमी केली. त्यामुळे भाविनाने टाईम-आऊट घेतला. त्यानंतर तिने दोन्ही गुण जिंकत हा गेम ११-८ अशा फरकाने जिंकत हा सामनाही जिंकला. झांगविरुद्ध ११ सामन्यांत हा भाविनाचा पहिलाच विजय ठरला.

- Advertisement -

पॅरालिम्पिक पदार्पणात अविस्मरणीय कामगिरी

गुजरातच्या सुंधीया गावातील दुकानदार हसमुख पटेल यांची कन्या भाविनाकडून पदकाची अपेक्षा केली जात नव्हती. परंतु, पॅरालिम्पिक पदार्पणात तिने अविस्मरणीय कामगिरी केली आहे. ‘मी इथे केवळ सर्वोत्तम खेळ करण्याचा विचार करून आले होते. मी १०० टक्के देऊन खेळले, तर मला पदक आपोआपच मिळेल असा माझा विचार होता. देशवासियांचा मला पाठिंबा असून आता मी आत्मविश्वासाने खेळ केल्यास मला सुवर्णपदक जिंकण्यात यश येईल. मी अंतिम सामन्यासाठी सज्ज आहे,’ असे उपांत्य फेरीतील विजयानंतर भाविना म्हणाली.

- Advertisement -

हेही वाचा – ‘कोणाला तरी संघाबाहेर बसावे लागणारच’; अश्विनबाबत माजी क्रिकेटपटूचे विधान


 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -