घरक्रीडाएका भूमिकेत पंचवीस वर्षे बींग पायरो

एका भूमिकेत पंचवीस वर्षे बींग पायरो

Subscribe

डेव्हिड सुशेत याला लोक पायरो म्हणूनच ओळखायला लागले होते. तोही तसेच समजू लागला होता. त्यामुळेच त्याच्या मृत्यूच्या प्रसंगाचे चित्रण हा एवढ्या दीर्घकाळ त्याच्या भूमिकेतच वावरल्याने मोठा अवघड प्रसंग होता. त्या प्रसंगाच्या चित्रणासाठी निघतानाच्या प्रसंगापासूनच त्याने सादर केलेला आणि निर्माता दिग्दर्शक क्रिस मलोनने बनवलेला बींग पायरो हा लघुपट सुरू होतो. त्यामुळे आपण लगेचच त्याच्याशी एकरूप होतो.

कथा किंवा कादंबरी वाचताना कधी वाटतं की त्यातील व्यक्तिरेखा भेटाव्या. असे वाटणे म्हणजे त्या आवडलेल्या व्यक्तिरेखांबाबतचे प्रेमच असते. काही थोडा काळ भुरळ घालतात तर काहींची जादू कित्येक दशकांनंतरही कमी होत नाही. प्रख्यात रहस्यकथा लेखिका अ‍ॅगाथा ख्रिस्ती यांच्या कथा, कादंबर्‍यांतील गुप्तहेर हर्क्युल पायरो ही एक अशी व्यक्तिरेखा. त्याची पहिली कथा 1920 मध्ये प्रसिद्ध झाली आणि आता जवळपास शतकानंतरही पायरो लोकांना आवडतो. याचे वैशिष्ठ्य म्हणजे याच्या कथांत क्चचितच कधी मारामारी असते. त्याचा मुख्य भर बारकाईने पुरावे शोधून काढून आणि संबंधितांच्या मनाचा अभ्यास करून तो आडाखे बांधतो आणि ते क्वचितच चुकतात.

स्पेलिंगमुळे पायरोचा उच्चार पावरो वा पायरॉट असाही केला जातो. त्याची निर्मिती करताना अ‍ॅगाथाने खूप विचार केला होता आणि त्याच्या नावापासून त्याची आकृती, चाल, मिशा, अंड्याच्या आकारासारखे डोके आणि अ‍ॅक्सेंट म्हणजे, विशिष्ट शैलीत बोलण्याची ढब, त्याच्या सवयी अशा अनेक गोष्टी ठरवल्या होत्या. इंग्लंडमध्ये तो आपल्या कामाने प्रसिद्ध असला तरी तो मूळचा बेल्जियन आहे. तेथील पोलीस खात्यातून निवृत्त होऊन तो लंडनमध्ये राहात आहे. कॅप्टन हेस्टिंग हा त्याचा सहकारी आहे, आणि तो अगदी मनापासून पायरोला मदत करणारा आहे.

- Advertisement -

अ‍ॅगाथा ख्रिस्तीने पायरो ही मध्यवर्ती व्यक्तिरेखा असलेल्या 50 कथा आणि 33 कादंबर्‍या लिहिल्या आणि त्या सर्वच जगभर गाजल्या. पायरोची नवी कथा काय असेल हा सर्वांच्या कुतूहलाचा विषय असे आणि प्रत्येकवेळी त्यांना नवे काहीतरी गवसत असे, त्यामुळेच त्याच्या लोकप्रियतेत सतत भरच पडत गेली. इतकी की त्याचा मृत्यू त्याच्या चाहत्यांना आवडणार नाही आणि ते रागावतील, म्हणून अ‍ॅगाथाने कर्टन, ही पायरोचा मृत्यू असलेली कादंबरी 1942 मध्येच लिहिली होती, तरी ती आपल्या मृत्यूनंतरच प्रसिद्ध करण्यात यावी, असे तिने सांगितले होते. म्हणूनच ती गुप्तपणे एका बँकेच्या सेफ डिपॉझिट व्हॉल्डमध्ये सुरक्षित ठेवण्यात आली होती. ती 1975 मध्ये अ‍ॅगाथाच्या निधनानंतर प्रकाशित झाली. त्याच्या मृत्यूची बातमी न्यूयॉर्क टाइम्सच्या पहिल्या पानावर झळकली होती, यावरूनच पायरोचे माहात्म्य ध्यानात यावे.

अशा या पायरोच्या लोकप्रियतेचा मोह नाटक आणि सिनेमावाल्यांना वाटला नसता तरच नवल. पहिली कादंबरी, द मिस्टीरिअस अफेअर अ‍ॅट स्टाइल्स, प्रकाशित झाल्यावर पाठोपाठ चार कादंबर्‍या आल्या. तीनच वषार्र्नी मर्डर ऑफ रॉजर अ‍ॅक्रॉइड या कादंबरीवर आधारलेले नाटक अ‍ॅलिबी या नावाने रंगमंचावर आले आणि त्यात प्रख्यात अभिनेता चर्लस लॉटन पायरो बनला होता. नंतर सहा वर्षांनी त्यावरच आधारलेला चित्रपटही आला. नंतरही अनेक चित्रपट आले. विविध अभिनेत्यांनी पायरो रंगवला. पण नाही म्हटले तरी ते अल्पकाळच त्या भूमिकेत होते.

- Advertisement -

पण डेव्हिड सुशेत याची गोष्टच वेगळी. त्याने तब्बल पाव शतकभर दूरचित्रवाणीवरील तेरा मालिकांमध्ये पायरोची भूमिका केली आणि ती एवढी चांगली होती की, लोक त्याला पायरो म्हणूनच ओळखायला लागले होते. तो म्हणतो की, मी स्वतःला पायरोच समजू लागलो होतो. त्यामुळेच त्याच्या मृत्यूच्या प्रसंगाचे चित्रण हा एवढ्या दीर्घकाळ त्याच्या भूमिकेतच वावरल्याने मोठा अवघड प्रसंग होता, माझ्यासाठीच नव्हे तर आमच्या निर्मिती टीममधील सवार्र्साठीच. त्या प्रसंगाच्या चित्रणासाठी निघतानाच्या प्रसंगापासूनच त्याने सादर केलेला आणि निर्माता दिग्दर्शक क्रिस मलोनने बनवलेला बींग पायरो हा लघुपट सुरू होतो. त्यामुळे आपण लगेचच त्याच्याशी एकरूप होतो. पायरोच्या चाहत्यांना तर एक वेगळाच अनुभव आल्यासारखे वाटायला लागते.

लघुपटाचे निवेदन डेव्हिडचेच आहे आणि तो बोलत असतोः माझा ड्रायव्हर मला आता कामाला नेत आहे. मी शेवटचा प्रसंग करण्यासाठी स्टुडिओत निघालो आहे, माझा ड्रायव्हर मला तेथे नेत आहे, पण मी विचारातच गर्क आहे. ही पायरोची शेवटची फिल्म आहे, आज माझ्या अभिनयाचा कस लागणार आहे. कारकिर्दीतील एक अत्यंत कठिण दिवस… कारण आज पायरो मरणार आहे. त्या व्यक्तिरेखेत शिरणे ही अगदी अवघड, आणि अगदी बारीक सारीक बारकावे ध्यानात घेऊन करायची कामगिरी आहे. कपडे करण्यापासून गाडीत बसेपर्यंत मी विचार करत आहे.

या चित्रणासाठी स्टुडिओत एका छोट्या खोलीचा सेट आहे, पायरोची निजण्याची खोली. त्यामुळे तेथे दिग्दर्शक कॅमेरामन याखेरीज कुणी नाही. बाहेर मात्र इतर सारे एकाग्रतेने गंभीर होऊन चित्रीकरण पडद्यावर बघत आहेत. त्यात त्याची पत्नी शीलादेखील आहे. या प्रसंगासाठी डेव्हिडने जवळजवळ 15 किलो वजन कमी केले होते. कर्टनच्या चित्रीकरणासाठी तो आला, तेव्हा सुटातील हाडाचा सापळाच वाटत होता, असे त्याच्या सहकार्‍याने म्हटले आहे. हा अखेरचा प्रसंग अर्थातच पायरोचा साथीदार हेस्टिंग्ज सांगत आहे. डेव्हिडला फक्त मृत्यूला सामोरे जातानाचा प्रसंग रंगवायचा आहे. ते खूप अवघड काम होते. पण त्याने ते अप्रतिमपणे साकारले आणि सर्वांनाच विषण्ण केले. नंतर मात्र सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे अभिनंदन केलेले आपण पाहतो.

यानंतर मग डेव्हिड आपल्याला घेऊन विविध ठिकाणी जातो आणि त्या ठिकाणांचे महत्त्व सांगतो, तेथील प्रसंगही सांगतो. अ‍ॅगाथा ख्रिस्तीचे घर ग्रीनवे, 1938 ते 75 या काळातील तिचे समर हाऊस. तेथे तिची मुलगी त्याला भेटते. ती त्याला सांगतेः आमची एकच इच्छा होती की, पायरोबरोबर लोकांनी हसले पाहिजे, पण पायरोला नाही! त्याचा स्वभाव कसा, वागणे कसे, एककल्ली वाटला तरीही तो मानवता विसरत नाही, आणि हे सारे त्याच्या भूमिकेतून स्पष्ट होते. याबाबत डेव्हिड सांगतोः मला प्रथम या भूमिकेसाठी विचारले तेव्हा मी लगेचच हो म्हटले. पण मला इशारा देत दिग्दर्शक म्हणाला की, यामुळे तुझे आयुष्यच बदलेल. आणि ते खरेच आहे.

नंतर तो अ‍ॅगाथाचा नातू मॅथ्यु प्रिचार्ड याला भेटतो. तो त्याला डेव्हनशायर येथे पायरोचा जन्म झाला असे सांगतो. आजीला आपला हा पायरो एवढा लोकप्रिय होईल याची कल्पनाही नसेल. तिने एका बसमधून उतरून जाणारे बेल्जियन निर्वासित पाहिले. तेव्हा ते तसे सगळीकडेच जात. त्यातला एकच लहानखुरा माणूस तिने पाहिला आणि ठरवले हाच माझा नायक. त्यावर डेव्हिड म्हणतो की माझे काम तिला आवडले असते अशी मी आशा करतो.

त्यानंतर तो पायरो संग्रहालयाला भेट देतो. तेथे आपण काहीतरी भेट द्यायला हवे म्हणून तो पायरोच्या भूमिकेत वापरलेली काठी देतो. गेली 25 वर्षे तिच्याएवढा स्पर्श मी कोणालाच केला नाही, असे सांगतो, तेव्हा व्यवस्थापक म्हणतोः खरे आहे, ती अद्यापही उबदार आहे. तेथे पायरोची खोली, त्याच्या वस्तू व इतर बरेच आपल्याला पाहायला मिळते. नंतर तो सॅम करन या संशोधकाला भेटतो. तो त्याला त्याचे अ‍ॅगाथाच्या सिक्रेट डायरीज बाबत सांगतो आणि प्रथम पायरोचा उल्लेख कधी आहे, ते दाखवतो. नंतर अ‍ॅगाथाने तो कसा असावा याबाबतची तयार केलेली टिपणेही दाखवतो आणि अखेर तो कसा साकार झाला हे सांगतो. त्यावरः मी त्याला न्याय दिला असेल, अशी आशा करतो, असे डेव्हिड म्हणतो.

पायरोच्या मिशा ही जणू त्याला ओळखण्याची खूणच बनली आहे. डेव्हिड म्हणतो की, ही मिशी लावली की मी पायरोच बनतो. तो जसा विचार करत असेल तसाच विचार करू लागतो. त्याच्यावरील मालिका विविध भाषांतही डब केल्या गेल्या आणि जगातील 100 देशांमध्ये प्रेक्षकप्रिय झाल्या. इतक्या की, डेव्हिड म्हणतोः मला आता मिशी नसतानाही लोक पायरो म्हणूनच ओळखतात. आणि मग तो आपल्याला पायरोच्या निवासस्थानी नेतो व्हाइटहेवन मॅन्शन आणि हे नक्कीच पायरोचे निवासस्थान असेल असे वाटते. कारण त्याचे वर्णन कादंबर्‍यांतून आलेले आहे.

पायरोचा मूळ देश बेल्जम. म्हणून मग डेव्हिड ब्रुसेल्सला जातो. तेथेही लोक पायरो म्हणूनच त्याच्याकडे बघतात. तो पोलीस प्रमुखांना भेटतो. तेथून त्याला खास इतमामात महापौरांच्या भेटीसाठी नेले जाते. तो विचारतोः तुम्हाला पायरो का आवडतो, त्यावर ते उत्तरतातः ब्रिटिशांना जे गहन प्रश्न सुटले ते त्याने सोडवले म्हणून. त्यामुळेच आम्हाला त्याचा अभिमान आहे. तेथे त्याचा जन्माचा दाखलाही तयार करण्यात आला आहे, तो डेव्हिड बघतो. डेव्हिड सांगतोः मर्डर ऑन द ओरिएंट एक्स्प्रेस हा अप्रतिम सिनेमा मी पुन्हा पुन्हा पाहिला. त्या गाडीतून प्रवास केला, तेथील कर्मचार्‍यांनी त्याचे मनापासून स्वागत केले. त्या काळातील गाडी कशी होती ते पाहिले. ही अफलातून कथा आहे आणि बर्फामुळे अडकून पडलेल्या गाडीत खून झाला आहे. 12 संशयित आहेत. त्यामुळे पायरोचे काम अवघड आहे. पण तो ते करतो. खुनी एकच असला तरी बाकी सवार्र्नीही त्या मृतदेहावर चाकूचे आघात केले आहेत हे स्पष्ट करतो. पण खुन झालेला त्याच पातळीचा होता म्हणून मानवतेच्या दृष्टीने त्या सर्वांना मुक्त करतो. याचे चित्रीकरण ही अवघड बाब होती. कारण याच कथेवरील चित्रपट 1973 मध्ये येऊन अत्यंत लोकप्रिय झाला होता. पण त्या परीक्षेतही मी उतरलो, असे डेव्हिड सांगतो.

चार्लस लॉटनप्रमाणे पीटर उस्तिनोव, अल्बर्ट फिनी या अभिनेत्यांनीही पायरो साकार केला होता. तोही लोकांना आवडला होता. त्यामुळेच डेव्हिडपुढील आव्हान मोठे होते, पण त्याने ते यशस्वीपणे पार पाडले. असा हा वेगळ्या पठडीतला लघुपट, अवश्य पहावा असा. त्यासाठी नेटवर ( https://youtu.be/FX3ITew9Mpw) ही लिंक आहे. या वर्षातील हा अखेरचा लेख. वाचकांना वेगवेगळ्या चित्रपटांविषयी काही देण्याचा प्रयत्न या सदरातून मी केला. वाचकांना तो आवडला असावा, कारण हे सदर सुरू राहिले. पण आता मात्र थोडी विश्रांती. वाचकांनी या सदराबाबतची त्यांची मते [email protected] वर अवश्य कळवावी. पुढील वर्षी काहीतरी वेगळे… धन्यवाद!

– आ. श्री. केतकर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -