धोनीच्या ट्विटर अकाऊंटवरून ब्ल्यू टिक गायब; चाहतेही गोंधळले

धोनीचे ट्विटरवर ८ मिलियनहून (८० लाख) अधिक फॉलोअर्स आहेत.

twitter removes blue tick from ms dhoni's account
महेंद्रसिंग धोनीच्या ट्विटर अकाऊंटवरून ब्ल्यू टिक गायब

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी जागतिक क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक मानला जातो. धोनीच्या नेतृत्वात भारताने २००७ टी-२० आणि २०११ एकदिवसीय असे दोन वर्ल्डकप जिंकले. तसेच तो कर्णधार असतानाच भारतीय संघाला २०१३ साली चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा जिंकण्यात यश आले होते. आयसीसीच्या या तिन्ही स्पर्धा जिंकणारा तो जागतिक क्रिकेटमधील केवळ एकमेव कर्णधार आहे. धोनीने मागील वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. मात्र, तो अजूनही इंडियन प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत खेळत आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाच्या या कर्णधाराचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. परंतु, हे चाहते शुक्रवारी गोंधळले. धोनीच्या ट्विटर अकाऊंटवरून ब्ल्यू टिक अचानक गायब झाल्याचे दिसले. परंतु, याचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही.

ms dhoni twitter
धोनीच्या ट्विटर अकाऊंटवरून ब्ल्यू टिक गायब

धोनीचे अखेरचे ट्विट ८ जानेवारीला 

भारताचे बहुतांश क्रिकेटपटू हे सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या सतत संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. परंतु, धोनी सोशल मीडियावर फारसा अ‍ॅक्टिव्ह नसतो. धोनीने अखेरचे ट्विट ८ जानेवारीला केले होते. मात्र, अजूनही धोनीचे ८ मिलियनहून (८० लाख) अधिक फॉलोअर्स आहेत. आता त्याच्या ट्विटर अकाऊंटवरून ब्ल्यू टिक अचानक गायब झाली आहे. मात्र, त्याचे अकाऊंट अचानक अन-व्हेरिफाय करण्यामागचे कारण स्पष्ट झालेले नाही.

चाहत्यांनी व्यक्त केली नाराजी 

मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट ट्विटरने धोनीच्या अकाऊंटवरून ब्ल्यू टिक काढल्यानंतर चाहते गोंधळले आहेत. बहुतांश चाहत्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो अजूनही जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्यामुळे त्याला अशी वागणूक देणे योग्य नसल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे.