World U-20 Athletics : भारताच्या मिश्र रिले संघाला कांस्यपदक; जागतिक अ‍ॅथलेटिक्सच्या अध्यक्षांकडून कौतुक

२० वर्षांखालील जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेच्या इतिहासातील हे भारताचे पाचवे पदक ठरले.

india u20 mixed relay team
U-20 World Athletics : भारताच्या मिश्र रिले संघाला कांस्यपदक

भारताने नुकत्याच झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये विक्रमी कामगिरी केली होती. भारताला या स्पर्धांमध्ये सात पदके जिंकण्यात यश आले होते आणि ऑलिम्पिक स्पर्धांतील ही भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. भारताच्या युवा खेळाडूंनीही आता या कामगिरीतून प्रेरणा घेत दमदार खेळ करण्यास सुरुवात केली आहे. २० वर्षांखालील जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेतील ४x४०० मिश्र रिले क्रीडा प्रकाराच्या सांघिक गटात भारताने कांस्यपदकाची कमाई केली. या स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारत श्रीधर, कपिल, प्रिया मोहन आणि सुम्मी यांनी ३ मिनिटे २०.६० सेकंद अशी वेळ नोंदवत ४x४०० मिश्र रिलेच्या अंतिम फेरीत तिसरा क्रमांक पटकावला. भारतीय संघाच्या या कामगिरीचे जागतिक अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष सेबॅस्टियन को यांनी कौतुक केले.

को यांची भारतीय खेळाडूंसोबत चर्चा

नैरोबी येथे सुरु असलेल्या २० वर्षांखालील जागतिक अ‍ॅथलेटिक्समध्ये सहभागी झालेल्या जगभरातील खेळाडूंशी चर्चा करून आणि त्यांचे अभिनंदन करताना खूप छान वाटले. पुढील पिढीतील या प्रतिभावान खेळाडूंना पाहिल्यावर आपला खेळ योग्य हातांमध्ये असल्याची खात्री पटते, असे को म्हणाले. त्यांनी भारतीय खेळाडूंशी संवाद साधतानाचा व्हिडिओ ट्विटरवरून शेअर केला.

जागतिक स्पर्धेची अशीच सुरुवात झाली पाहिजे. तुमच्या ४x४०० मिश्र रिले संघाचे अभिनंदन. तुम्ही पात्रता फेरीतही उत्कृष्ट कामगिरी केलीत, असे को यांनी भारतीय खेळाडूंना म्हटले. तसेच भारत देश म्हणून खेळांमध्ये आता वेगाने प्रगती करत असल्याचेही ते म्हणाले. २० वर्षांखालील जागतिक अ‍ॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासातील हे भारताचे पाचवे पदक ठरले.


हेही वाचा – ऑलिम्पिक पदकासाठी वेळ लागला, मात्र भारतीय हॉकीचे भवितव्य उज्ज्वल