घरक्रीडाआयेक्सची पहिल्या लेगमध्ये टॉटनहॅमवर मात

आयेक्सची पहिल्या लेगमध्ये टॉटनहॅमवर मात

Subscribe

 युएफा चॅम्पियन्स लीग

युवा खेळाडू डॉनी वॅन डी बिकने केलेल्या गोलमुळे डच संघ आयेक्सने युएफा चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या लेगमध्ये इंग्लिश संघ टॉटनहॅम हॉट्सपरचा १-० असा पराभव केला. या विजयामुळे आयेक्सने तब्बल २३ वर्षांनंतर या स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या दिशेने एक पाऊल टाकले आहे. टॉटनहॅमचे स्टार खेळाडू हॅरी केन आणि सॉन ह्युंग मिन अनुक्रमे दुखापतीमुळे आणि बंदीमुळे या सामन्याला मुकले. या दोघांची कमी टॉटनहॅम खासकरून पूर्वार्धात जाणवली. त्यातच या सामन्यात त्यांचा अनुभवी डिफेंडर जॅन व्हर्टोनघनला दुखापत झाल्याने टॉटनहॅमच्या अडचणी अधिकच वाढल्या.

या सामन्याच्या सुरुवातीपासूनच आयेक्सने आक्रमक खेळ केला, तर टॉटनहॅमने बचाव करण्यावर भर दिला. आयेक्सने केलेल्या आक्रमक खेळाचा त्यांना सामन्याच्या १५ व्या मिनिटाला फायदा मिळाला. हकीम झाईचच्या पासवर डॉनी वॅन डी बिकने गोल करत आयेक्सला १-० अशी आघाडी मिळवून दिली. या गोलला अधिक महत्त्व होते कारण हा सामना प्रतिस्पर्धी संघाच्या घरच्या मैदानावर होता. आयेक्सने पुढेही आक्रमक खेळ सुरू ठेवल्यामुळे या सामन्याच्या २४ व्या मिनिटाला त्यांना पुन्हा गोल करण्याची संधी मिळाली, पण वॅन डी बिकने मारलेला फटका टॉटनहॅमचा गोलरक्षक ह्यूगो लॉरीसने अडवला, तर मध्यंतराआधी टॉटनहॅम गोल करण्याची संधी मिळाली.

- Advertisement -

किरेन ट्रीपियरच्या फ्री-किकवर डिफेंडर टोबी अ‍ॅल्डरवायरेल्डने मारलेला हेडर गोलच्या वरून गेला. त्यामुळे मध्यंतराला आयेक्सची १-० अशी आघाडी कायम राहिली.मध्यंतरानंतर टॉटनहॅमने चांगले पुनरागमन केले. त्यांनी आक्रमक खेळ करत गोल करण्याच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, केन आणि सॉन यांच्या अनुपस्थितीत टॉटनहॅमला गोल करण्यात अपयश येत होते. दुसरीकडे सामन्याच्या ७८ व्या मिनिटाला आयेक्सला गोल करण्याची संधी मिळाली, पण डेविड नेरेसने मारलेला फटका गोलपोस्टला लागला. यानंतर दोन्ही संघांना गोल करता आला नाही आणि आयेक्सने हा सामना १-० असा जिंकला. आता या लढतीचा दुसरा लेग ९ मे रोजी आयेक्सच्या मैदानावर होणार आहे.

युरोपियन स्पर्धांमध्ये इंग्लिश संघांनी डच संघांविरुद्ध आपल्या घरच्या मैदानावर झालेल्या मागील ३० सामन्यांपैकी अवघे ३ सामने गमावले आहेत. यापैकी २ पराभव हे टॉटनहॅमच्या नावावर आहेत. आयेक्सविरुद्धच्या पराभवाआधी टॉटनहॅमने २००८ मध्ये पीएसव्हीविरुद्धचा सामना गमावला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -