घरक्रीडाडी मारियाचे दोन गोल; पॅरिसचा विजय

डी मारियाचे दोन गोल; पॅरिसचा विजय

Subscribe

युएफा चॅम्पियन्स लीग

अँजेल डी मारियाच्या दोन गोलच्या जोरावर पॅरिस सॅन्ट जर्मानने युएफा चॅम्पियन्स लीगच्या साखळी सामन्यात स्पेनमधील बलाढ्य संघ रियाल माद्रिदला ३-० असे पराभूत केले. या सामन्यात पॅरिसच्या बचावफळीने उत्कृष्ट खेळ केला. त्यामुळे माद्रिदला १६७ सामन्यांत पहिल्यांदा एकही फटका गोलवर मारता आला नाही. याच गटात क्लब ब्रुज आणि गॅलतासराय या संघांमधील सामना गोलशून्य बरोबरीत संपला.

गट ‘अ’मधील रियाल माद्रिदविरुद्धच्या सामन्यात पॅरिसला स्टार खेळाडू नेयमार, किलियन एम्बापे आणि एडींसन कवानी यांच्याविनाच खेळावे लागले. मात्र, याचा त्यांच्या खेळावर फारसा परिणाम झाला नाही. पॅरिसच्या खेळाडूंनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. याचा फायदा त्यांना १४ व्या मिनिटाला मिळाला. जुआन बर्नातच्या पासवर डी मारियाने गोल करत पॅरिसला १-० अशी आघाडी मिळवून दिली.

- Advertisement -

यानंतरही त्यांनी आक्रमक खेळ सुरू ठेवला. ३३ व्या मिनिटाला डी मारिया अप्रतिम फटका मारत आपला आणि संघाचा दुसरा गोल केला. पुढच्याच मिनिटाला माद्रिदच्या गॅरेथ बेलने गोल केला. मात्र, त्याआधी चेंडू त्याच्या हाताला लागल्याने हा गोल रद्द करण्यात आला. त्यामुळे मध्यंतराला पॅरिसने आघाडी कायम राखली.

मध्यंतरानंतर माद्रिद सामन्यात पुनरागमन करेल असे अपेक्षित होते. मात्र, तसे झाले नाही. पॅरिसच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ केला. त्यामुळे माद्रिदला गोल करण्याच्या फारशा संधी निर्माण करता आल्या नाहीत. माद्रिदने आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचा फायदा पॅरिसलाच झाला. ९० मिनिटांनंतरच्या अतिरिक्त वेळेत थॉमस मुनेयेरने गोल केला आणि पॅरिसने हा सामना ३-० असा जिंकला.

- Advertisement -

ज्युव्हेंटस-अ‍ॅट. माद्रिद सामन्यात बरोबरी

गट ‘डी’मध्ये ज्युव्हेंटस आणि अ‍ॅटलेटिको माद्रिद या बलाढ्य संघांमधील युएफा चॅम्पियन्स लीगचा साखळी सामना २-२ असा बरोबरीत राहिला. या सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांना गोल करता आला नाही. उत्तरार्धात जुआन कुद्रादो आणि ब्लेस मात्विडीने गोल करत ज्युव्हेंटसला २-० अशी आघाडी मिळवून दिली होती. परंतु, यानंतर स्टेफान सॅविच आणि हेक्टर हरेरा यांनी केलेल्या गोलमुळे हा सामना २-२ असा बरोबरीत संपला.

सामन्यांचे निकाल

पॅरिस ३-० रियाल माद्रिद
क्लब ब्रुज ०-० गॅलतासराय
मॅन. सिटी ३-० शाक्तार
डीनॅमो झाग्रेब ४-० अ‍ॅटलांटा
ज्युव्हेंटस २-२ अ‍ॅट. माद्रिद
लोकोमोटिव्ह २-१ लेव्हरकुसेन
बायर्न म्युनिक ३-० रेड स्टार
ऑलिम्पियाकोस २-२ टॉटनहॅम

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -