Champions League : चेल्सीची अंतिम फेरीत धडक; रियाल माद्रिदवर मात

२९ मे रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात चेल्सीपुढे मँचेस्टर सिटीचे आव्हान असेल.

chelsea enter into final of ucl
मेसन माऊंटचा गोल, चेल्सीची माद्रिदवर मात 

इंग्लिश संघ चेल्सीने व्यावसायिक फुटबॉलमधील सर्वात मोठी स्पर्धा मानल्या जाणाऱ्या युएफा चॅम्पियन्स लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी उपांत्य फेरीत बलाढ्य रियाल माद्रिदचा पराभव केला. उपांत्य फेरीच्या पहिल्या लेगमध्ये १-१ अशी बरोबरी होती. दुसऱ्या लेगमध्ये (परतीचा सामना) मात्र चेल्सीने अप्रतिम खेळ केला. त्यांनी दुसरा लेग २-० असा जिंकून ही लढत एकूण ३-१ अशी जिंकली. त्यामुळे त्यांनी तिसऱ्यांदा चॅम्पियन्स लीगची अंतिम फेरी गाठली. २९ मे रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात चेल्सीपुढे मँचेस्टर सिटीचे आव्हान असेल. दोन इंग्लिश संघांमध्ये अंतिम सामना होण्याची ही तिसरीच वेळ असणार आहे.

वेर्नर, माऊंटचे गोल   

उपांत्य फेरीच्या दुसऱ्या लेगमध्ये चेल्सीने अप्रतिम खेळ केला. माद्रिदला चेंडूवर ताबा मिळवण्यात यश आले. परंतु, त्यांना गोलच्या फारशा संधी निर्माण करता आल्या नाहीत. याऊलट चेल्सीने प्रतिहल्ला करत माद्रिदच्या बचाव फळीवर दबाव टाकला. याचा फायदा त्यांना २८ व्या मिनिटाला मिळाला. टिमो वेर्नरने गोल करत चेल्सीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात चेल्सीला गोलच्या बऱ्याच संधी मिळाल्या, पण त्यांच्या आघाडीच्या फळीतील खेळाडूंना गोल करण्यात अपयश आले. अखेर ८५ व्या मिनिटाला मेसन माऊंटने गोल करत चेल्सीला हा सामना २-० असा जिंकवून दिला.