घरक्रीडायुएफा चॅम्पियन्स लीग स्पर्धा

युएफा चॅम्पियन्स लीग स्पर्धा

Subscribe

सुपरस्टार खेळाडू लिओनेल मेस्सीच्या अप्रतिम २ गोलच्या जोरावर स्पॅनिश संघ बार्सिलोनाने युएफा चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीच्या पहिल्या लेगमध्ये इंग्लिश संघ लिव्हरपूलचा ३-० असा पराभव केला. त्यामुळे आता लिव्हरपूलला सलग दुसर्‍या वर्षी या स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागणार आहेत.

बार्सिलोना आणि लिव्हरपूल हे दोन्ही संघ आपल्या आक्रमक खेळासाठी ओळखले जातात. उपांत्य फेरीतील या सामन्याची सुरुवातही दोन्ही संघांनी आक्रमक खेळानेच केली. खासकरून मेस्सी जेव्हाही संधी मिळेल, तेव्हा लिव्हरपूलच्या बचाव फळीवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होता. त्यानेच मारलेला फटका लिव्हरपूलच्या बचाव फळीतील खेळाडूच्या हाताला लागला. मात्र, बार्सिलोनाला पेनल्टी मिळाली नाही. दुसरीकडे लिव्हरपूलचे खेळाडूही गोल करण्याच्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. अखेर २६ व्या मिनिटाला या सामन्याचा पहिला गोल झालाच.

- Advertisement -

जॉर्डी अल्बाच्या अप्रतिम मैदानी पासवर लिव्हरपूलचा माजी खेळाडू लुईस सुआरेझने गोल करत बार्सिलोनाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर लिव्हरपूलच्या साडियो माने आणि मो सलाहला गोल करण्याच्या संधी मिळाल्या, मात्र त्यांना फटके गोलवर मारता आले नाहीत. त्यामुळे या सामन्याच्या मध्यंतराला बार्सिलोनाने १-० अशी आघाडी कायम राखली.

मध्यंतरानंतर लिव्हरपूलने आपला आक्रमक खेळ सुरु ठेवला. लिव्हरपूलच्या जेम्स मिल्नर आणि सलाहने मारलेले फटके बार्सिलोनाचा गोलरक्षक टर-स्टेगनने चांगल्या पद्धतीने अडवत आपल्या संघाची आघाडी कायम ठेवली. एकीकडे लिव्हरपूल आक्रमक करत असतानाच दुसरीकडे मेस्सीने पुन्हा एकदा आपली जादू दाखवली. त्याने सामन्याच्या ७५ व्या मिनिटाला गोल करत बार्सिलोनाची आघाडी दुप्पट केली. यानंतर ८१ व्या मिनिटाला फॅबिनियोने सुआरेझला अयोग्यरित्या पडल्यामुळे बार्सिलोनाला फ्री-किक मिळाली. यावर मेस्सी अप्रतिम गोल करत बार्सिलोनाला ३-० अशी आघाडी मिळवून दिली. पुढे लिव्हरपूलला गोल करण्याची संधी मिळाली, पण सलाहने मारलेला फटका गोलपोस्टला लागल्याने लिव्हरपूलची गोलची पाटी कोरीच राहिली आणि बार्सिलोनाने हा सामना ३-० असा जिंकला.

- Advertisement -

मेस्सीचे ६०० गोल

लिओनेल मेस्सीने या सामन्यात २ गोल करत बार्सिलोनासाठी ६०० गोलचा टप्पा गाठला. त्याने या संघासाठी आपला पहिला गोल १४ वर्षांपूर्वी म्हणजेच २००५ मध्ये केला होता. त्याने हे ६०० गोल ६८३ सामन्यांत केले आहेत. त्याने ६०० पैकी ४१७ गोल हे ला लिगामध्ये, ५० गोल कोप देल रेमध्ये, ११२ गोल चॅम्पियन्स लीगमध्ये आणि २१ गोल हे इतर स्पर्धांमध्ये केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -