घरक्रीडाUEFA EURO : रशियाचा धुव्वा उडवत डेन्मार्कची बाद फेरीत धडक

UEFA EURO : रशियाचा धुव्वा उडवत डेन्मार्कची बाद फेरीत धडक

Subscribe

उप-उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात आता डेन्मार्कसमोर वेल्सचे आव्हान असेल.

डेन्मार्कने अखेरच्या साखळी सामन्यात रशियाचा ४-१ असा धुव्वा उडवत युएफा युरो २०२० फुटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. डेन्मार्कला यंदाच्या स्पर्धेची चांगली सुरुवात करण्यात अपयश आले होते. त्यांनी फिनलंडविरुद्धचा सामना ०-१ असा, तर बेल्जियमविरुद्धचा सामना १-२ असा गमावला होता. परंतु, अखेरच्या साखळी सामन्यात त्यांनी रशियावर ४-१ अशी मात करत गट ‘बी’मध्ये दुसरे स्थान पटकावले. त्यामुळे त्यांना बाद फेरी गाठण्यात यश आले. उप-उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात आता डेन्मार्कसमोर वेल्सचे आव्हान असेल. हा सामना येत्या शनिवारी (२६ जून) हॉलंडमधील अ‍ॅम्स्टरडॅम येथे होईल.

अखेरचा साखळी सामना जिंकणे अनिवार्य 

बाद फेरी गाठण्यासाठी डेन्मार्कला आपला अखेरचा साखळी सामना जिंकणे अनिवार्य होते. त्यांनी रशियाविरुद्धच्या सामन्यात उत्कृष्ट खेळ केला. ३८ व्या मिनिटाला मिकेल डॅम्सगार्डने अप्रतिम फटका मारून गोल करत डेन्मार्कला १-० अशी आघाडी मिळवून दिली. ही आघाडी त्यांनी मध्यंतरापर्यंत राखली. उत्तरार्धात डेन्मार्कने अधिकच आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. ५९ व्या मिनिटाला युसूफ पोल्सन, ७९ व्या मिनिटाला आंद्रेस क्रिस्टिन्सन आणि ८२ व्या मिनिटाला योकीम माएहलेने केलेल्या गोलमुळे डेन्मार्कने हा सामना ४-१ असा जिंकला.

- Advertisement -

बेल्जियमने पटकावले अव्वल स्थान

साखळी सामन्यांअंती गट ‘बी’मध्ये डेन्मार्क, फिनलंड आणि रशिया यांचे ३-३ गुण होते. परंतु, डेन्मार्कचा गोलफरक सर्वोत्तम असल्याने त्यांनी बाद फेरी गाठली. डेन्मार्कचा गोलफरक +१ असा होता. त्यांनी तीन साखळी सामन्यांत पाच गोल केले, तर प्रतिस्पर्धी संघाला त्यांच्याविरुद्ध चार गोल करता आले. दुसरीकडे बेल्जियमने अखेरच्या साखळी सामन्यात फिनलंडला २-० असे पराभूत केले. त्यामुळे त्यांना ‘बी’ गटात ९ गुणांसह अव्वल स्थान पटकावण्यात यश आले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -