घरक्रीडाUEFA EURO : इटलीची अंतिम फेरीत धडक; पेनल्टी शूट-आऊटमध्ये स्पेनवर मात

UEFA EURO : इटलीची अंतिम फेरीत धडक; पेनल्टी शूट-आऊटमध्ये स्पेनवर मात

Subscribe

अंतिम फेरीत इटलीचा इंग्लंड आणि डेन्मार्क यांच्यातील विजेत्याशी सामना होईल. 

इटलीने उपांत्य फेरीत स्पेनवर पेनल्टी शूट-आऊटमध्ये ४-२ अशी मात करत युएफा युरो २०२० फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. या सामन्यापूर्वी इटलीचा संघ मागील ३२ सामने अपराजित होता, तर स्पेनने मागील २९ सामन्यांपैकी केवळ एक सामना गमावला होता. त्यामुळे उपांत्य फेरीच्या या सामन्याबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती आणि अपेक्षेप्रमाणेच हा सामना चुरशीचा झाला. ९० मिनिटे आणि त्यानंतर ३० अतिरिक्त मिनिटांच्या खेळानंतर या सामन्यात १-१ अशी बरोबरी होती. त्यामुळे सामन्याचा विजेता ठरवण्यासाठी झालेल्या पेनल्टी शूट-आऊटमध्ये इटलीने ४-२ अशी बाजी मारली. अंतिम फेरीत इटलीचा इंग्लंड आणि डेन्मार्क यांच्यातील विजेत्याशी सामना होईल.

स्पेनने इटलीवर वर्चस्व गाजवले

इंग्लंडमधील वेम्बली स्टेडियममध्ये ५८ हजार चाहत्यांच्या उपस्थितीत झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात स्पेनने सुरुवातीपासूनच इटलीच्या बचाव फळीवर दबाव टाकला. २५ व्या मिनिटाला स्पेनच्या डॅनी ऑल्मोने मारलेला फटका इटलीचा गोलरक्षक डोनारुमाने अडवला. कर्णधार सर्जिओ बुस्केट्स, कोके आणि पेड्री या मधल्या फळीतील त्रिकुटाच्या उत्कृष्ट खेळामुळे स्पेनने या सामन्यात इटलीवर वर्चस्व गाजवले. परंतु, त्यांना गोल करण्याच्या फारशा संधी निर्माण करता आल्या नाही.

- Advertisement -

इटलीने भक्कम बचाव करत प्रतिहल्ला केला

स्पेनने बराच काळ चेंडूवर ताबा मिळवला. तर इटलीने भक्कम बचाव करताना प्रतिहल्ला करण्याचा प्रयत्न केला. याचा फायदा त्यांना ६० व्या मिनिटाला मिळाला. फेडेरिको किएसाने गोल करत इटलीला १-० अशी आघाडी मिळवून दिली. परंतु, यानंतर स्पेनने स्ट्रायकर अल्वारो मोराटाला मैदानात उतरवले आणि त्याने ८० व्या मिनिटाला गोल करत स्पेनला १-१ अशी बरोबरी करून दिली. यानंतर निर्धारित वेळ आणि त्यानंतरच्या ३० अतिरिक्त मिनिटांच्या खेळात दोन्ही संघांना गोल करता आला नाही. त्यामुळे पेनल्टी शूट-आऊट झाले.

पेनल्टी शूट-आऊटमध्ये काय घडले?

पेनल्टी शूट-आऊटमध्ये इटलीच्या मॅन्युएल लोकाटेलीने मारलेली पहिली पेनल्टी स्पेनचा गोलरक्षक उनाई सिमॉनने अडवली. स्पेनच्या डॅनी ऑल्मोलाही गोल करता आला नाही. यानंतर इटलीकडून आंद्रेया बेलोटी, लिओनार्डो बोनुची आणि फेडेरिको बर्नार्डेस्की यांना, तर स्पेनकडून जेरार्ड मोरेनो आणि थियागो यांना चेंडू गोलजाळ्यात मारण्यात यश आले. परंतु, मोराटाने मारलेला फटका इटलीचा गोलरक्षक डोनारुमाने अडवला. त्यामुळे इटलीकडे ३-२ अशी आघाडी होती आणि स्पेनला पुढील पेनल्टी अडवणे अनिवार्य होते. परंतु, अनुभवी खेळाडू जॉर्जिन्होने अप्रतिम पेनल्टी मारत इटलीला हा सामना जिंकवून दिला.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -