घरक्रीडाइंग्लंडच्या फुटबॉलपटूंवर होणारी वर्णभेदी टीका अत्यंत निंदनीय; युसेन बोल्टचा हल्लाबोल

इंग्लंडच्या फुटबॉलपटूंवर होणारी वर्णभेदी टीका अत्यंत निंदनीय; युसेन बोल्टचा हल्लाबोल

Subscribe

इंग्लंडच्या या पराभवानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावरून रॅशफोर्ड, सँचो आणि साका या तिन्ही कृष्णवर्णीय खेळाडूंवर वर्णभेदी टीका केली.

युएफा युरो २०२० स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इटलीने इंग्लंडला पराभूत केले. इंग्लंडमधील वेम्बली स्टेडियममध्ये झालेला हा सामना ९० मिनिटे आणि ३० अतिरिक्त मिनिटांच्या खेळानंतर १-१ असा बरोबरीत होता. त्यानंतर झालेल्या पेनल्टी शूट-आऊटमध्ये इंग्लंडच्या मार्कस रॅशफोर्डने चेंडू गोल पोस्टवर मारला, तर जेडन सँचो आणि बुकायो साका या खेळाडूंनी मारलेल्या पेनल्टी इटलीचा गोलरक्षक डोनारुमाने अडवल्या. त्यामुळे इंग्लंडने हा सामना गमावला. इंग्लंडच्या या पराभवानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावरून रॅशफोर्ड, सँचो आणि साका या तिन्ही कृष्णवर्णीय खेळाडूंवर वर्णभेदी टीका केली. ही गोष्ट अतिशय निंदनीय आहे असे म्हणतानाच जमैकाचा महान धावपटू युसेन बोल्टने चाहत्यांवर हल्लाबोल केला.

खेळाडूंना दोष देऊ शकत नाही

खेळाडूला पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयश आल्याने चाहत्यांना राग येणे मी समजू शकतो. मात्र, फुटबॉल असो किंवा आयुष्य, कुठेही वर्णभेद होता कामा नये. सर्वात आधी म्हणजे, फुटबॉलपटूंवर होणारी वर्णभेदी टीका अत्यंत निंदनीय आहे. हा प्रकार पाहून मला दुःख होत आहे. मी स्वतः एक आफ्रिकन वंशाचा आणि कृष्णवर्णीय व्यक्ती आहे. त्यामुळे वर्णभेदी टीका होणाऱ्या खेळाडूंना कसे वाटत असेल हे मी समजू शकतो. परंतु, तुम्ही खेळाडूंना दोष देऊ शकत नाही. पेनल्टी कोण मारणार, हा निर्णय खेळाडूंच्या हातात नाही, असे बोल्ट म्हणाला.

पराभव पचवणे फार अवघड

फुटबॉलमध्ये तुम्ही काही सामने जिंकता आणि काही सामने गमावता. पराभव पचवणे फार अवघड असते. मी स्वतःचा याचा अनुभव घेतला आहे. परंतु, माझा आवडीचा संघ पराभूत झाल्याने मी कोणाला शिवीगाळ करत नाही. एखादा खेळाडू पेनल्टी यशस्वीरीत्या मारू शकला नाही म्हणून चाहत्यांना राग येणे मी समजू शकतो. परंतु, तुम्ही खेळाडूंवर वर्णभेदी टीका करणे योग्य नाही, असे म्हणत बोल्टने सोशल मीडियावरून खेळाडूंवर वर्णभेदी टीका करणाऱ्या चाहत्यांना सुनावले.
Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -