घरक्रीडाआर्सनलच्या विजयात लॅकाझेटची चमक

आर्सनलच्या विजयात लॅकाझेटची चमक

Subscribe

युएफा युरोपा लीग

अ‍ॅलेक्सांडर लॅकाझेटच्या २ गोलमुळे इंग्लिश संघ आर्सनलने युएफा युरोपा लीग स्पर्धेतील उपांत्य फेरीच्या पहिल्या लेगमध्ये स्पॅनिश संघ वेलंसियाचा ३-१ असा पराभव केला. या सामन्यात आर्सनलकडून तिसरा गोल पिअर एमरीक-ऑबामीयांगने केला. चेल्सी आणि आईन्ट्रॅक फ्रॅन्कफोर्ट यांच्यातील उपांत्य फेरीतील पहिला लेग १-१ असा बरोबरीत संपला.

आर्सनलविरुद्धच्या उपांत्य फेरीतील पहिल्या लेगची सुरुवात वेलंसियाने आक्रमक खेळाने केली. या सामन्याच्या ८व्या मिनिटाला वेलंसियाला आघाडी मिळवण्याची संधी होती. मात्र, गरायला चेंडू गोलमध्ये मारता आला नाही. सामन्याच्या ११ व्या मिनिटाला वेलंसियाला कॉर्नर किक मिळाली. कर्णधार डॅनी परेहोने मारलेल्या या कॉर्नरवर रॉड्रिगोने हेडर मारत चेंडू गोलजवळ नेला, त्यावर हेडर मारत मुक्तार डियाख्बीने गोल केला आणि वेलंसियाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, त्यांना ही आघाडी फारकाळ टिकवता आली नाही. या सामन्याच्या १८व्या मिनिटाला ऑबामीयांगच्या पासवर अ‍ॅलेक्सांडर लॅकाझेटने गोल करत आर्सनलला १-१ अशी बरोबरी करून दिली. आर्सनलने पुढेही आपला आक्रमक खेळ सुरू ठेवला. याचा फायदा त्यांना २५ मिनिटाला मिळाला, जेव्हा ग्रॅनिट झाकाच्या क्रॉसवर लॅकाझेटने हेडर मारत आर्सनलला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर दोन्ही संघांना गोल न करता आल्याने मध्यंतराला आर्सनलने आपली आघाडी कायम राखली.

- Advertisement -

मध्यंतरानंतर दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला. आर्सनलच्या ऑबामीयांग आणि लॅकाझेट यांना गोल करण्याच्या संधी मिळाल्या, पण त्यांना या संधीचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. दुसरीकडे वेलंसियाचा स्ट्रायकर केविन गमेरोला गोल करण्यात अपयश आले. त्यामुळे हा सामना २-१ असाच संपणार असे वाटत होते. मात्र, सामना संपण्याच्या काही सेकंद आधी ऑबामीयांगने गोल केल्यामुळे आर्सनलने हा सामना ३-१ असा जिंकला.

चेल्सीच्या सामन्यात बरोबरी

उपांत्य फेरीतील दुसर्‍या सामन्यात चेल्सी आणि आईन्ट्रॅक फ्रॅन्कफोर्ट यांच्यातील पहिल्या लेगमध्ये १-१ अशी बरोबरी झाली. फ्रॅन्कफोर्टच्या लुका जोवीचने २३ व्या मिनिटाला गोल करत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. तर सामन्याच्या ४५ व्या मिनिटाला रूबेन लॉफ्टस-चीकच्या पासवर पेड्रोने गोल करत चेल्सीला १-१ अशी बरोबरी करून दिली. हा सामना फ्रॅन्कफोर्टच्या मैदानावर झाल्याने आता दुसर्‍या लेगमध्ये फ्रॅन्कफोर्टला किमान १ गोल करणे अनिवार्य झाले आहे. या लढतीचा दुसरा लेग १० मे रोजी होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -