UEFA Nations League : नेदरलँड्सची जर्मनीवर मात

युएफा नेशन्स लीगच्या सामन्यात नेदरलँड्सने जर्मनीचा ३-० असा पराभव केला.

मेमफिस डिपाय (सौ-The Straits Times)

वर्जिल वॅन डाईक, मेमफिस डिपाय आणि वाईनआल्डम यांनी केलेल्या गोलच्या जोरावर युएफा नेशन्स लीगच्या सामन्यात नेदरलँड्सने जर्मनीचा ३-० असा पराभव केला. तब्बल १६ वर्षांनंतर नेदरलँड्सने जर्मनी पराभव केला आहे.

असा झाला सामना

या सामन्याच्या सुरूवातीपासून दोन्ही संघानी चांगला खेळ केला. नेदरलँड्सने जर्मनीपेक्षा जरा जास्त आक्रमक खेळ केला. याचा फायदा त्यांना ३० व्या मिनिटाला झाला. त्यांचा कर्णधार वर्जिल वॅन डाईकने गोल करत नेदरलँड्सला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर दोन्ही बचावफळींनी चांगला खेळ केल्याने मध्यंतरापर्यंत स्कोर १-० असाच होता. मध्यंतरानंतर जर्मनीने आक्रमक खेळ केला. त्यांनी लीरॉय साने आणि जुलिअन ड्रॅग्सलरला या दोन खेळाडूंना मैदानात आणले. या दोघांनीही जर्मनीसाठी गोल करायच्या संधी निर्माण केल्या. पण त्यांना गोल करण्यात अपयश आले. मग ८६ व्या मिनिटाला मेमफिस डिपायने गोल करत नेदरलँड्सची आघाडी २-० केली. यानंतर सामना संपायच्या काही मिनिटे आधी जीनी वाईनआल्डमने नेदरलँड्सचा तिसरा गोल केला. त्यामुळे नेदरलँड्सने हा सामना ३-० असा जिंकला.