घरक्रीडाUEFA Super Cup : चेल्सीला सुपर कपचे जेतेपद; केपा ठरला मॅचविनर

UEFA Super Cup : चेल्सीला सुपर कपचे जेतेपद; केपा ठरला मॅचविनर

Subscribe

केपाच्या उत्कृष्ट खेळामुळे चेल्सीने दुसऱ्यांदा सुपर कप पटकावला.

गोलरक्षक केपा अरीझाबलागाच्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर इंग्लिश संघ चेल्सीने युएफा सुपर लीग फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले. मागील मोसमात चॅम्पियन्स लीग आणि युरोपा लीग या स्पर्धा जिंकणाऱ्या संघांमध्ये हा सामना झाला. या सामन्यात चॅम्पियन्स लीग विजेत्या चेल्सीने पेनल्टी शूट-आऊटमध्ये युरोपा लीग विजेत्या विलारेयालचा ६-५ असा पराभव केला. हा सामना नियमित वेळ आणि ३० मिनिटांच्या अतिरिक्त खेळानंतर १-१ असा बरोबरीत होता. त्यामुळे पेनल्टी-शूट आऊट झाले आणि यात चेल्सीने बाजी मारत दुसऱ्यांदा सुपर कप पटकावला.

केपाने अडवल्या दोन पेनल्टी

केपाला २०१८ साली चेल्सीने खरेदी केले होते आणि तो फुटबॉल इतिहासातील सर्वात महागडा गोलरक्षक ठरला होता. परंतु, त्यानंतर त्याला चांगली कामगिरी करण्यात अपयश आले. त्यामुळे चेल्सीने मागील मोसमात गोलरक्षक एडवार्ड मेंडीला खरेदी केले होते. सुपर कपच्या सामन्याची सुरुवातही मेंडीने केली. परंतु, सामन्याचा विजेता ठरवण्यासाठी पेनल्टी शूट-आऊट होणार हे लक्षात आल्यावर चेल्सीचे प्रशिक्षक थॉमस टूशेल यांनी केपाला मैदानात उतरवले. केपाने विलारेयालच्या ऐसा मांडी आणि रॉल आल्बियोल यांच्या पेनल्टी अडवत प्रशिक्षकांचा विश्वास सार्थ ठरवला.

- Advertisement -

झियेश आणि मोरेनोचे गोल

त्याआधी बेलफास्ट येथे झालेल्या या सामन्याच्या पूर्वार्धात चेल्सीने आक्रमक खेळ केला. परंतु, विलारेयालचा गोलरक्षक असेन्होने अप्रतिम खेळ करत चेल्सीला गोल करण्यापासून रोखले. २७ व्या मिनिटाला हकीम झियेशने मारलेला फटका तो अडवू शकला नाही आणि चेल्सीला १-० अशी आघाडी मिळाली. उत्तरार्धात विलारेयालने दमदार पुनरागमन केले. याचा फायदा त्यांना ७३ व्या मिनिटाला मिळाला. मागील मोसमात ३० गोल करणाऱ्या जेरार्ड मोरेनोने यंदा पहिल्याच सामन्यात गोल करत विलारेयालला १-१ अशी बरोबरी करून दिली. यानंतर दोन्ही संघांना गोल करता आला नाही आणि विजेता ठरवण्यासाठी पेनल्टी शूट-आऊट झाले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -