IPL 2021: उमरानने वेगवान गोलंदाजीत मोडला स्वतःचाच विक्रम, वाचा IPL चे विक्रम

Umran malik

सनरायझर्स हैद्राबाद संघाचा युवा खेळाडू उमरान मलिकने आयपीएलमध्ये सर्वात वेगाने चेंडू फेकण्याचा विक्रम आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच केला. इतक्या वेगाने गोलंदाजी करणारा असा उमरान पहिलाच खेळाडू ठरला आहे. उमरानचे हे पेस सेन्सेशन दुसऱ्या सामन्यातही पहायला मिळाले. दुसराच सामना खेळत असताना उमरानने वेगवान गोलंदाजी करून दोन वेळा हा विक्रम आपल्या नावे केला आहे. बुधवारी रॉयल चँलेंजर्स बंगळुरू विरूध्दच्या सामन्यात त्याने १५२.९५ किलोमीटर प्रतिताशीच्या वेगाने चेंडू फेकला. तो आयपीएल हंगामात एवढ्या वेगाने चेंडू फेकणारा एकमेव भारतीय खेळाडू बनला आहे. महत्वाचे म्हणजे त्याने दुसऱ्या सामन्यात आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेटही मिळवली आहे.

मोडला स्वतःचाच विक्रम 

भारतीय खेळाडू म्हणून सर्वात वेगाने चेंडू फेकण्याच्या यादीत त्याने पहिल्याच सामन्यात आपले नाव कोरले होते. रविवारी केकेआर विरूध्दच्या सामन्यात २१ वर्षीय उमरानला आपला कारकीर्दीतील पहिला (डेब्यू ) सामना खेळण्याची संधी मिळाली होती. त्या सामन्यात उमरानने १५१.०३ किलोमीटर प्रतिताशीच्या वेगाने चेंडू फेकून हा विक्रम आपल्या नावे केला होता.

बुधवारी विराट कोहलीच्या आरसीबी विरूध्दच्या सामन्यात ताशी १५३ किलोमीटर वेगाने चेंडू फेकून उमरानने आपल्याच विक्रमाला मोडीत काढले. या चेंडूने आधीच्या विक्रमाच्या वरचढ अशा आणखी एका विक्रमाची नोंद केली. उमरानला याच सामन्यादरम्यान आपल्या आयपीएल कारकीर्दीतील पहिला बळी देखील मिळाला. ह्या हंगामात सर्वात वेगाने चेंडू फेकणारा खेळाडू म्हणून उमरानची नोंद झाली आहे. आतापर्यंत केकेआरचा वेगवान बॉलर लॉकी फर्ग्यूसनच्या नावावर हा विक्रम होता.

IPL मध्ये कोणाच्या नावे वेगवान गोलंदाजीचा विक्रम ?

उमरान मलिकच्या अगोदर सर्वात वेगाने चेंडू फेकण्याचा विक्रम भारतीय संघाचा बॉलर नवदीप सैनीच्या नावावर होता. आयपीएल हंगामात आरसीबी कडून खेळताना नवदीप सैनीने ताशी १५२.८५ किमी प्रतिताशीच्या वेगाने चेंडू फेकून हा विक्रम आपल्या नावे केला होता. आयपीएल हंगामात सर्वात जास्त वेगाने चेंडू फेकण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा युवा खेळाडू एनरिच नोत्जे याच्या नावावर आहे, नोत्जेने ताशी १५६.२२ किमी प्रतिताशीच्या वेगाने चेंडू फेकला होता. आयपीएल मध्ये वेगाने चेंडू फेकण्याच्या यादीत पहिले ३ खेळाडू दक्षिण आफ्रिकेचेच आहेत. एनरिच नोत्जे नंतर डेल स्टेन दुसऱ्या क्रमांकावर आहे. स्टेनने ताशी १५४.४० किमी चेंडू फेकला होता, तर कगिसो रबाडा ताशी १५४.२३ किमी वेगाने चेंडू फेकत तिसऱ्या क्रमांकावर आहे.