घरक्रीडाजल्लोष करावा, पण अशाप्रकारे नाही!

जल्लोष करावा, पण अशाप्रकारे नाही!

Subscribe

भारतीय कर्णधार गर्गची बांगलादेशवर टीका

भारताचा पराभव करत बांगलादेशने पहिल्यांदा १९ वर्षांखालील विश्वचषकाचे जेतेपद पटकावले. या ऐतिहासिक कामगिरीनंतर बांगलादेशी युवा खेळाडूंनी मैदानावर धावत येत जोरदार जल्लोष केला. त्यांचे काही खेळाडू शिवीगाळ करत असल्याचे पाहायला मिळाले. ही बाब भारतीय खेळाडूंना फारशी आवडली आणि दोन संघांच्या खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक, धक्काबुक्की झाली. बांगलादेशने ज्याप्रकारे जल्लोष केला, तो निंदनीय होता, असे सामन्यानंतर भारताचा कर्णधार प्रियम गर्ग म्हणाला.

आम्ही शांत होतो. तुम्ही काही सामने जिंकता, तर काही हरता. हा खेळाचा भागच आहे. मात्र, बांगलादेशच्या खेळाडूंनी ज्याप्रकारे जल्लोष केला, तो फारच निंदनीय होता. त्यांनी असे वागायला नको होते, असे गर्गने नमूद केले. बांगलादेशचा कर्णधार अकबर अली याचे स्पष्टीकरण देताना म्हणाला, जे घडले, ते योग्य नव्हते. नक्की काय झाले हे मला ठाऊक नाही. मात्र, हा अंतिम सामना होता. अंतिम सामन्यात खेळाडूंवर दडपण असते आणि अशात तुम्ही भावना व्यक्त करता. आमचे काही गोलंदाज जास्तच भावूक झाले. परंतु, जे घडले, त्याचे मी समर्थन करणार नाही. आम्ही प्रतिस्पर्ध्याचा आणि खेळाचा आदर केलाच पाहिजे. मी संघाच्या वतीने सर्वांची माफी मागतो.

- Advertisement -

आयसीसी करणार कारवाई?
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) घडलेल्या प्रकारचा व्हिडिओ बघून खेळाडूंवर कारवाई करायची की नाही याचा निर्णय घेईल, असे भारतीय १९ वर्षांखालील संघाचे व्यवस्थापक अनिल पटेल यांनी सांगितले. बांगलादेशी खेळाडूंच्या वर्तनाबाबत सामन्यानंतर मी पंच आणि सामनाधिकार्‍यांशी संवाद साधला. आयसीसी आता घडलेल्या प्रकारचा व्हिडिओ बघून खेळाडूंवर कारवाई करायची की नाही याचा निर्णय घेईल, असे पटेल म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -