उरण, अलिबागची विजयी सलामी

१९ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धा

क्रिकेट

उरण आणि अलिबाग या संघांनी बोकरडवीरा-उरण येथे सुरू झालेल्या १९ वर्षांखालील मुलांच्या रायगड जिल्हा निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेत विजयी सलामी दिली. उरण स्पोर्ट्स असोसिएशन आणि यू. व्ही. पनवेल यांच्यात झालेल्या सामन्यात उरणने ११८ धावांनी विजय मिळवला, तर अलिबागने उरणच्या धीरज क्रिकेट क्लबचा ९ गडी राखून पराभव केला.

उरण अणि पनवेल यांच्यात झालेल्या सामन्यात उरणने प्रथम फलंदाजी करताना ४० षटाकांत सर्वबाद १७६ अशी धावसंख्या उभारली. त्यांच्याकडून साईराज काळेने ४६ आणि ॠषिकेश यादवने २९ धावांचे योगदान दिले. पनवेलच्या विपूल पाटीलने ३३ धावांत ४ बळी घेतले. १७७ धावांचा पाठलाग करताना पनवेलचा डाव २४.२ षटकांत ५८ धावांमध्ये आटोपला. उरणच्या तनिष्क गावीने १८ धावांत ३ गडी बाद केले. वरुण म्हात्रे, कृतज्ञ मढवी यांनी प्रत्येकी २ गडी बाद करत त्याला उत्तम साथ दिली.

दुसरीकडे अलिबाग क्रिकेट असोसिएशनविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना धीरज क्रिकेट क्लबचा डाव १७.१ षटकांत अवघ्या ५१ धावांत आटोपला. अलिबागच्या राहुल नवखारकरने अचूक मारा करत अवघ्या ३ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले. अलिबागने ५२ धावांचे आव्हान अवघी १ विकेट गमावून पूर्ण करत सामना जिंकला. राहुल नवखारकर सामनावीर ठरला.