नवी दिल्ली : देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प 2025-26 सादर केला. यावेळी एकीकडे सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या घोषणा करत असताना दुसरीकडे त्यांनी क्रीडा विभागासाठी काही महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. अर्थमंत्र्यांनी क्रीडा अर्थसंकल्पात 350 कोटी रुपयांपेक्षा अधिक वाढ केली असून यामध्ये सर्वाधिक फायदा हा खेलो इंडिया गेम्सला होणार असल्याचे या घोषणेतून समोर आले आहे. या मार्फत केंद्र सरकार क्रीडा विभागामध्येही प्रोत्साहन देण्यासाठी आग्रही असल्याचे सांगितले आहे. (Union Budget 2025 increased sport budget by rs 350 crore khelo india)
हेही वाचा : Union Budget 2025 : दोन घरांच्या मालकांसाठी मोठी बातमी, अर्थसंकल्पात केली ही घोषणा
शहरापासून खेड्यापर्यंतच्या खेळाडूंना तसेच सर्व क्रीडा प्रकरणातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने खेलो इंडियाची योजना सुरू केली आहे. या या अंतर्गत तळागाळात क्रीडा पायाभूत सुविधा वाढवणे, युवकांची खेळातील आवड वाढवणे आणि देशात क्रीडा संस्कृती निर्माण करण्याचे काम करण्यात येते. यावेळी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेल्या घोषणेनुसार, खेलो इंडियासाठी 2025-26 या आर्थिक वर्षात 1,000 कोटी रुपयांचे बजेट देण्यात आले असून हे गेल्या आर्थिक वर्षापेक्षा 200 कोटी रुपये अधिक आहे. केंद्र सरकारने 2018 मध्ये खेलो इंडियाची सुरुवात केली आहे. तेव्हापासून भारत सरकारने या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. देशाच्या विविध भागातून उदयोन्मुख खेळाडूंना मंच उपलब्ध करून देणे हा महत्त्वाचा उद्देश राहिला आहे. केंद्र सरकारने अर्थमंत्र्यांनी 2023-24 या आर्थिक वर्षात या योजनेचे बजेट 880 वरून 20 कोटी रुपयांनी वाढवून 900 कोटी रुपये केले होते. तर 2022-23 या आर्थिक वर्षात खेलो इंडियासाठी 596.39 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
मोठ्या स्पर्धा नसतानाही 350 कोटींची वाढ
दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी 351.98 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या वाढीसह क्रीडा मंत्रालयाला खेळ आणि खेळाडूंच्या विकासासाठी एकूण 3,794.30 कोटी रुपये देण्यात आले आहेत. पण यंदाच्या वर्षी कोणत्याही मोठ्या स्पर्धा नसतानाही ही वाढ केल्याने अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. दरम्यान, नॅशनल स्पोर्ट्स फेडरेशनच्या अर्थसंकल्पातही वाढ करण्यात आली आहे. याआधी यासाठी 340 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. तर, यावर्षी 400 कोटी रुपये देण्यात आले आहेत. भारत 2036 मध्ये ऑलिम्पिक खेळांचे आयोजन करण्याचा प्रयत्न आहे. यावेळी, ऑलिम्पिक खेळांच्या आयोजनासाठी भारताला पायाभूत सुविधांची गरज आहे.