उस्मान ख्वाजा भारताविरुद्धच्या मालिकेला मुकण्याची शक्यता

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजाला पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत गुढघ्याला दुखापत झाली. या दुखापतीवर शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलियन फलंदाज उस्मान ख्वाजा (सौ-Fox Sports)

पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजाच्या गुढघ्याला दुखापत झाली. ही त्याची दुखापत इतकी गंभीर आहे की या दुखापतीवर शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. तसे जर झाले तर त्याला किमान आठ आठवडे क्रिकेटपासून दूर रहावे लागू शकते. त्यामुळे ६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या भारताविरुद्धच्या मालिकेला ख्वाजा मुकण्याची शक्यता शक्यता आहे.

ऑस्ट्रेलियासाठी मोठा धक्का

उस्मान ख्वाजा जर भारताविरुद्धच्या मालिकेला मुकला तर हा ऑस्ट्रेलियासाठी मोठा धक्का असेल. बॉल टॅंपरिंगमुळे बंदी घालण्यात आलेल्या स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरच्या अनुपस्थितीत ख्वाजा हा ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम कसोटी फलंदाज आहे. त्याने पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात अप्रतिम १४१ धावांची खेळी केली होती. त्याच्या या खेळीने ऑस्ट्रेलियाला पराभवापासून वाचवले होते. तसेच या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने ८५ धावा काढल्या होत्या. त्यामुळे तो चांगल्या फॉर्मात होता. दुसऱ्या कसोटीतील तिसरा दिवस सुरू होण्याआधी वॉर्मअप करताना ख्वाजाला दुखापत झाली. त्यामुळे तो या सामन्याच्या दुसऱ्या डावात फलंदाजीही करू शकला नाही.

शॉन मार्शवर ऑस्ट्रेलियाची भिस्त 

उस्मान ख्वाजाला जर भारतीय मालिकेला मुकावे लागले तर शॉन मार्शवर ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीची भिस्त असेल. ऑस्ट्रेलियाने मागील काही काळात कसोटी क्रिकेटमध्ये चांगले प्रदर्शन केले आहे. पण त्याला पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगला खेळ करण्यात अपयश आले. त्याला या मालिकेच्या चार डावांत मिळून १४ धावा केल्या. पण जर ख्वाजा भारतीय मालिकेत खेळू शकला नाही तर मार्शला सातत्यपूर्ण प्रदर्शन करावे लागेल. त्याच्यासोबत मिचेल मार्श, अॅरॉन फिंच आणि ट्रॅव्हिस हेड यांनाही जबाबदारीने फलंदाजी करावी लागेल.