Homeक्रीडाIND VS ENG : टी-20 मालिकेतील उत्तम गोलंदाजीचे मिळाले बक्षीस, फिरकीपटूला वनडे...

IND VS ENG : टी-20 मालिकेतील उत्तम गोलंदाजीचे मिळाले बक्षीस, फिरकीपटूला वनडे संघात संधी

Subscribe

येत्या 6 फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी वरुण चक्रवर्तीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

मुंबई : इंग्लंडविरुद्ध नुकतीच पार पडलेली टी-20 मालिका भारताने 4-1 ने जिंकली. या मालिकेत स्टार लेग-स्पिनर वरुण चक्रवर्तीने 9.85 च्या सरासरीने 14 विकेट्स घेत मालिकावीर होण्याचा मान पटकावला होता. या उत्तम प्रदर्शनाचे वरुण चक्रवर्तीला आता बक्षीस मिळाले आहे. येत्या 6 फेब्रुवारीपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी वरुण चक्रवर्तीचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. (Varun Chakravarthy included in Indian squad for ODI series against England)

तंदुरुस्तीच्या कारणास्तव बीसीसीआयने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी संघातून वगळले आहे. त्याच्या जागी बीसीसीआयने फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीचा भारतीय संघात समावेश केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर, भारतीय संघाला या महिन्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 देखील खेळायची आहे. यासाठीच बीसीसीआयने जसप्रीत बुमराहला आराम देत वरुण चक्रवर्तीची निवड केली. तसेच इंग्लंडविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना 6 जानेवारी रोजी नागपूरमध्ये खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियममध्ये पोहोचला आहे. आज भारतीय खेळाडूंनी एकदिवसीय सामन्यासाठी सराव केला. यावेळी वरुण चक्रवर्ती हा नेटमध्ये गोलंदाजी करताना दिसला.

वरुण चक्रवर्तीने अद्याप भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेले नाही. तथापि, त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळलेल्या 23 लिस्ट ए सामन्यांमध्ये 4.28 च्या इकॉनॉमी दराने 59 विकेट्स घेतल्या आहेत. अलिकडेच, राजकोटमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात त्याने पाच विकेट्स घेत सर्वांचे लक्ष वेधले होते. याचपार्श्वभूमीवर इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी आधीच निवडलेल्या संघात बीसीसीआयने रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव यांना संधी दिली होती. यानंतर आता बीसीसीआयने वरुण चक्रवर्तीला संघात स्थान दिले आहे.

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती.