नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 चा मेगा लिलाव आज, रविवार (24 नोव्हेंबर) आणि उद्या, सोमवार (25 नोव्हेंबर) रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे होत आहे. या लिलावात तब्बल 577 खेळाडूंवर बोली लावली जात असून, त्यापैकी जास्तीत जास्त 204 खेळाडूंची विक्री होणार आहे. विशेष म्हणजे पहिल्या दिवशी भारताचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत हा आयपीएलच्या इतिहासतला सर्वात महागडा खेळाडू बनला आहे. मात्र आज दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या बोलीत दिग्गज खेळाडू अनसोल्ड राहिल्याचे पाहायला मिळत आहे. (Veteran players unsold on second day of Tata IPL mega auction)
दुसऱ्या दिवशी मेगा लिलावाला सुरुवात झाल्यानंतर भारताचा माजी खेळाडू अजिंक्य रहाणेवर एकाही संघाने बोली लावली नाही. कारण दोन हंगामापूर्वी झालेल्या लिलावात चेन्नई सुपर किंग्जमध्ये सामील झालेल्या रहाणेने पहिल्या सत्रात संघासाठी चमकदार कामगिरी केली होती, मात्र गेल्या मोसमात फॉर्ममध्ये घसरण झाल्यामुळे रहाणेला चेन्नई संघाने बाहेरचा रस्ता दाखवला होता. अशातच यंदाच्या मेगा लिलावात त्याला खरेदीदार मिळाली नाही.
हेही वाचा – IND VS AUS Test : बुमराहची ऐतिहासिक कामगिरी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठा विजय नोंदवत विक्रमांचा धडाका
भारताचा युवा खेळाडू पृथ्वी शॉला देखील लिलावात कोणत्याही संघाने विकत घेतले नाही. अलीकडेच फिटनेस समस्या आणि शिस्तभंगाच्या कारवाईचा सामना करावा लागल्यामुळे त्याने आपली मूळ किंमत फक्त 75 रुपये ठेवली होती. मात्र त्याला आपल्या संघात सामील करून घेण्यास एकाही संघाने स्वारस्य दाखवले नाही. याशिवाय पंजाब किंग्जचा खेळाडू मयंक अग्रवाल, चेन्नई सुपर किंग्जचा खेळाडू शार्दुल ठाकूर आणि यष्टिरक्षक श्रीकर भरत यांनाही लिलावात खरेदीदार मिळाला नाही. परदेशी खेळाडूंमध्ये न्यूझीलंडच्या केन विल्यमसन, ग्लेन फिलिप्स आणि डॅरिल मिशेल यांनाही एकाही संघाने विकत घेतले नाही.
यंदाच्या हंगामात कमी बोली लागलेले खेळाडू
दरम्यान, गेल्या मोसमात आरसीबीचा कर्णधार असलेल्या फाफ डू प्लेसिसला दिल्ली कॅपिटल्सने फक्त 2 कोटी रुपयांना विकत घेतले. तर दुसरीकडे गेल्या मोसमात राजस्थान रॉयल्सचा खेळाडू असलेल्या रोव्हमन पॉवेलला कोलकाता नाईट रायडर्सने 2 कोटी रुपये मोजले. भारतीय खेळाडूंपैकी वॉशिंग्टन सुंदरला गुजरात टायटन्सने 3.2 कोटी रुपयांना विकत घेतले. गेल्या लिलावात पंजाबने इंग्लंडचा खेळाडू सॅम कुरनसाठी 18.50 कोटी मोजले होते. मात्र आता त्याला चेन्नई सुपर किंग्जने फक्त 2.40 कोटी रुपयांना विकत घेतले. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को जॅनसेनला पंजाबने 7 कोटी रुपयांना विकत घेतले. कोलकाता संघाचा खेळाडू नितीश राणाला राजस्थान रॉयल्सने 4.20 कोटींमध्ये आपल्या संघात सामील करून घेतले. तसेच लखनऊ संघाचा खेळाडू आणि हार्दिक पांड्याचा भाऊ कृणाल पांड्याला आरसीबीने 5.75 कोटींना विकत घेतले.
हेही वाचा – Supreme Court : राज्यघटनेतून धर्मनिरपेक्ष-समाजवाद शब्द काढून टाकण्याची मागणी; न्यायालयाने याचिका फेटाळली