विराटच्या एका इशाऱ्यानं चाहत्यांना केलं गप्प, सामन्यादरम्यानचा व्हिडीओ व्हायरल

भारत आणि ऑस्ट्रेलिया सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली याच्यासोबत एक वेगळाच प्रसंग घडला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. विराट कोहली हा मैदानात असो किंवा मैदानाबाहेर, मीडियाचे कॅमेरे जसे त्याच्यावर रोखलेले असतात, तशा चाहत्यांच्या नजराही त्याच्यावर खिळलेल्या असतात. त्याला पाहून चाहत्यांमध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. खेळासोबत तो आपल्या छोट्यामोठ्या कृतीतून चाहत्यांची मनं जिंकत असतो.

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये नागपूर येथे खेळल्या गेलेल्या सामन्याच्या वेळी देखील विराट कोहलीनं सर्वांची मनं जिंकली. सामना सुरू होण्यापूर्वी स्टेडियममध्ये उपस्थित काही प्रेक्षकांनी ‘आरसीबी, आरसीबी’ अशा घोषणा देत विराट कोहलीचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. हे पाहून विराट काहीसा त्रस्त झाला.

विराट कोहलीने स्वत:च्या जर्सीवरील लोगोकडं बोट दाखवलं आणि टीम इंडियाचा लोगो दाखवला. आजच्या सामन्यात मी आयपीएल फ्रँचायझीचं नव्हे तर भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करत आहे, असं सांगायचा प्रयत्न त्यानं केला. विराटच्या या कृतीनंतर प्रेक्षकांनी काही वेळेतच घोषणाबाजी बंद केली. हे सगळं घडत असताना हर्षल पटेल सुद्धा तिथं उपस्थित होता. विराट आणि त्याच्या चाहत्यांमध्ये घडलेल्या या प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.


हेही वाचा : IND vs AUS : दुसऱ्या सामन्यात जसप्रीत बुमराह आणि दीपक चहरच्या पुनरागमनाची शक्यता