विराटला इंग्लंडच्या ट्रेंटब्रिजवर मिळाला ‘हा’ सन्मान

विराटला हा नवा सन्मान इंग्लंडमध्ये मिळाला आहे. ट्रेंटब्रिजवरील ऑनर्स बोर्डावर विराटचं नाव कोरण्यात आलं आहे.

virat kohli
विराट कोहली

टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली यानं इंग्लंडमधील तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये आपलं २३ वं शतक झळकवलं. या शतकानंतर ट्रेंटब्रिजवरील ऑनर्स बोर्डावर विराटचं नाव कोरण्यात आलं आहे. विराटला हा नवा सन्मान इंग्लंडमध्ये मिळाला आहे. तिसऱ्या टेस्ट मॅचमधील पहिल्या इनिंगमध्ये विराट ९७ रन्स बनवून आऊट झाला होता. मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये ही कसर भरून काढत विराटनं १०३ रन्स केल्या. तर एजबेस्टनमध्येही विराटनं एकाकी झुंज देत १४९ रन्सची धुवाधार खेळी केली होती. दरम्यान दिलेल्या सन्मानासंदर्भात बीसीसीआयनं आपल्या ट्विटर अकाऊंटवर विराटचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये विराटनं आपल्याला दिलेल्या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त केला.

विराटनं केला आनंद व्यक्त

ट्रेंटब्रिजवरील ऑनर्स बोर्डावर नाव कोरल्याच्या सन्मानामुळं विराट आनंदी आहे. ‘मला ऑनर्स बोर्डावर नाव कोरण्यात आल्यामुळं आनंद झाला आहे. विशेषतः तुमच्या प्रयत्नांना एक जागा मिळते असे वाटते. यामुळं भारतीय टीमलादेखील फायदा होईल,’ अशी भावना विराटनं बीसीसीआयला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केली आहे. ‘वास्तविक अशा गोष्टी जीवनात काही वेगळं दर्शवत नाहीत, मात्र हा खेळाचा एक भाग आहे. पण एखाद्या खेळाडूसाठी हे अविस्मरणीय क्षण आहेत. जगभरात खेळाडू म्हणून आपण कुठे पोहचलो आहोत याची जाणीव होते,’ असंही विराटनं म्हटलं आहे. तर, ‘मला बोर्ड ऑनर्स मिळाल्याबद्दल अभिमान आहे. यामुळं टीम इंडियाचंदेखील मानसिक बळ नक्कीच वाढेल. मला खूपच आनंद आहे,’ असंही विराटनं सांगितलं.

विराट पुन्हा एकदा अव्वल

टेस्ट मॅचमध्ये पुन्हा एकदा विराट अव्वल बॅट्समन झाला आहे. मागच्या दोन टेस्ट मॅचमध्ये टीम इंडियानं चांगली कामगिरी केली नव्हती. त्यामुळं विराटचा क्रमांक पुन्हा एकदा खाली आला होता. मात्र, ट्रेंटब्रिजमधील कामगिरी केल्यानंतर विराट पुन्हा एकदा अव्वलस्थानी पोचला आहे.