घरक्रीडारोहित शर्माचे उपकर्णधार पद काढून घ्या, विराटचा निवड समितीला प्रस्ताव

रोहित शर्माचे उपकर्णधार पद काढून घ्या, विराटचा निवड समितीला प्रस्ताव

Subscribe

विराट कोहलीने आगामी टी २० वर्ल्ड स्पर्धेनंतर कर्णधारपद सोडण्याच्या घोषणेनंतर आता इंडियन टीमच्या ड्रेसिंग रूममधून एक मोठी अशी स्फोटक माहिती समोर आली आहे. विराटने भारतीय संघाच्या निवड समितीला रोहित शर्माला हटवण्याचा प्रस्ताव दिल्याच्या वृत्ताने एकच खळबळ माजली आहे. तर विराटने ज्युनिअर खेळाडूंना मोक्याच्या वेळी अडचणीत आणल्याचाही अनुभव अनेक खेळाडूंकडून शेअर करण्यात आला आहे. एकुणच विराटला कर्णधार पदासाठी टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंचा पाठिंबा नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (Virat kohli proposal to selection committee to removal of rohit sharma as vice captain)

भारतीय निवड समितीने विराटने सादर केलेल्या रोहित शर्माबाबतच्या प्रस्तावाबाबत खूपच आश्चर्य व्यक्त केले आहे. विराटने रोहित शर्माला एकदिवसीय सामन्यांच्या उपकर्णधार पदावरून हटविण्यात यावे अशी मागणी निवड समितीकडे एका प्रस्तावाकडून केली होती. रोहितचे वाढलेले वय हे प्रस्तावासाठीचे कारण दिले होते. रोहित शर्मा ३४ वर्षांचा असल्यानेच त्याला उपकर्णधार पदावरून हटवावे असा प्रस्ताव विराटने निवड समितीला दिला होता. तसेच उपकर्णधार पदाची जबाबदारी ही केएल राहुलला द्यावी अशीही मागणी प्रस्तावातून विराटने निवड समितीकडे केली होती. पण निवड समितीला विराटने दिलेला हा प्रस्ताव पटला नसल्याचेही कळते. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार विराट कोहलीचा प्रस्ताव एकुणच निवड समितीला पटलेला नाही. त्यामुळे निवड समितीच्या सदस्यांनीही याबाबतची नाराजी व्यक्त केली असल्याचे कळते.

- Advertisement -

ज्युनिअर खेळाडूंचीही तक्रार

विराटला असणारा पाठिंबाही आता कमी होत असल्याचे चित्र काही तक्रारींच्या माध्यमातून दिसत आहे. विराट कोहलीच्या विरोधात अनेक ज्युनिअर खेळाडूंनी तक्रारी केल्या आहेत. अडचणीच्या काळात विराट कोहली हा ज्युनिअर खेळाडूंना अडचणीत टाकत असल्याचा आरोप काही ज्युनिअर खेळाडूंनी केला आहे. ऑस्ट्रेलियात पाच विकेटनंतर कुलदीप यादवला संघातून बाहेर जावे लागले. तर ऋषभ पंतच्या खराब फॉर्ममध्येही त्यालाही असाच अनुभव आला होता. तर वेगवान गोलंदाज असलेल्या उमेश यादवलाही विराटकडून असाच काही अनुभव आल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता ज्युनिअर खेळाडूंनीही विराटच्या विरोधात बोलायला सुरूवात केली असल्याची माहिती आहे.

गावस्करांचा बीसीसीआयला सल्ला

सुनिल गावस्कर यांनी बीसीसीआयच्या निर्णयाचे स्वागत करत भविष्याचा विचार करत विराटच्या कर्णधार पदाबाबतचा चांगला निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले आहे. पण आता बीसीसीआयने के एल राहुलला पुढचा कर्णधार म्हणून घडवावे असेही त्यांनी सुचवले आहे. रोहित शर्मासोबतच के एल राहुलला उपकर्णधार पद द्यावे अशी सूचना त्यांनी बीसीसीआयला केली आहे. के एल राहुलने निकत्याच इंग्लंड दौऱ्यातही चांगली कामगिरी केली आहे. तसेच आयपीएल आणि ५० षटकांच्या सामन्यातही के एल राहुल चांगली कामगिरी करत असल्याचे गावस्कर यांनी म्हटले आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -