Virat Kohli Resigns : ट्वेन्टी २०, वन डे नंतर विराट कोहलीचा कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा, ट्विट करत दिली माहिती

दक्षिण आफ्रिकेविरोधात कसोटी सामना गमावल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने कर्णधारपदाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. विराट कोहलीने आज(शनिवार) कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. यासंदर्भात त्याने स्वत: ट्विट करत माहिती दिली आहे.

विराट कोहलीने आपल्या ट्विटमध्ये लिहिलयं की, संघाला योग्य दिशेने नेण्यासाठी सात वर्षांची मेहनत आणि अथक परिश्रम घेत मी अत्यंत प्रामाणिकपणे काम केले आणि तिथे काहीही कमी पडू दिले नाही. प्रत्येक गोष्ट कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर थांबली पाहिजे. आणि माझ्यासाठी भारताचा कसोटी कर्णधार म्हणून आता थांबण्याची वेळ आलीय. मला माझ्या देशाचे नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्दल मी बीसीसीआयचे आभार मानू इच्छितो आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे संघाचा आभारी आहे. त्या सर्व सहकाऱ्यांचे ज्यांनी पहिल्या दिवसापासून मला पूर्ण पाठिंबा दिला. परिस्थिती कशीही असो मी कधीही हार मानली नाही.

विराट कोहलीने टी-२० चं कर्णधारपद सोडल्यानंतर विराट कोहली आणि बीसीसीआय यांच्यामध्ये सुरू होता. कोहलीने २०१४ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी कर्णधारपदाची सुरुवात केली. तेव्हापासून तो भारतीय संघाचा कर्णधार होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केपटाऊन कसोटी हा त्याच्या कर्णधारपदाचा शेवटचा सामना होता, ज्यात भारताचा सात विकेट्सनी पराभव झाला होता.

कोहलीचा कर्णधारपदाचा प्रवास यशस्वी मानला जातो. त्याच्या नेतृत्वाखाली हा संघ जगातील नंबर वन कसोटी संघ बनला. परदेश दौऱ्यांमध्ये संघाने सातत्याने चांगली कामगिरी केली. भारतीय संघ २०२१ मध्ये पहिल्या कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. आकडेवारीनुसार, तो भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे.


हेही वाचा : राज्यातील काही जिल्ह्यात कोरोना लसीचा तुटवडा, कोरोना बैठकीनंतर अजित पवारांची माहिती