IND vs AUS t20 : कोहलीची झुंजार खेळी वाया; ऑस्ट्रेलियाने टाळला व्हाईटवॉश

तिसऱ्या सामन्यात कोहलीने ६१ चेंडूत ८५ धावांची खेळी केली.

Virat Kohli
विराट कोहली

विराट कोहलीने कर्णधाराला साजेशी खेळी करूनही भारतीय संघाला तिसऱ्या टी-२० लढतीत पराभवाचा सामना करावा लागला. यजमान ऑस्ट्रेलियाने १२ धावांनी हा सामना जिंकत व्हाईटवॉश टाळला. टी-२० क्रिकेटमध्ये भारताचा हा या वर्षातील पहिलाच पराभव ठरला. याआधी भारताने नऊ सामने जिंकले होते. भारताला तिसरा टी-२० सामना जिंकण्यात अपयश आले असले तरी त्यांनी तीन सामन्यांच्या या मालिकेत २-१ अशी बाजी मारली. तिसऱ्या सामन्यात कोहलीने ६१ चेंडूत ८५ धावांची खेळी केली.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. दुखापतीमुळे दुसऱ्या टी-२० सामन्याला मुकलेल्या कर्णधार फिंचचे या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमन झाले. मात्र, वॉशिंग्टन सुंदरने त्याला खातेही न उघडता माघारी पाठवले. सुंदरनेच स्टिव्ह स्मिथलाही (२४) बाद केले. मात्र, मॅथ्यू वेडने ३४ चेंडूत आपले सलग दुसरे अर्धशतक पूर्ण केले. तसेच त्याने ग्लेन मॅक्सवेलच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी रचली. मॅक्सवेलला युजवेंद्र चहलने १८ धावांवर बाद केले होते. मात्र, रिप्लेमध्ये चहलने नो-बॉल टाकल्याचे निदर्शनास आल्याने तिसऱ्या पंचांनी मॅक्सवेलला नाबाद ठरवले. मॅक्सवेलने या संधीचा फायदा घेत ३६ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. तसेच वेडने ५३ चेंडूत ८० धावांची केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने २० षटकांत ५ बाद १८६ अशी धावसंख्या उभारली.

याचा पाठलाग करताना भारताचा सलामीवीर लोकेश राहुलला मॅक्सवेलने पहिल्याच षटकात खातेही न उघडता बाद केले. शिखर धवन आणि कर्णधार कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी रचली. मात्र, लेगस्पिनर मिचेल स्वॅपसनने धवन (२८), संजू सॅमसन (१०) आणि श्रेयस अय्यर (०) यांना झटपट माघारी पाठवत भारताला अडचणीत टाकले. यानंतर हार्दिक पांड्याच्या (२०) साथीने कोहलीने भारताला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. परंतु, हे दोघे षटकांत परतल्याने भारताला २० षटकांत ७ बाद १७४ धावाच करता आल्या.