T20 World Cup : चहलला भारतीय संघातून वगळल्याने सेहवाग संतापला; निवडकर्त्यांकडे मागितलं स्पष्टीकरण

युजवेंद्र चहलला टी-२० वर्ल्ड कपसाठी भारतीय संघातून वगळल्याचा निर्णय अचंबित करणारा आहे, असे भारताचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागने म्हटले आहे. चहलला संघात का निवडले नाही याचे स्पष्टीकरण निवड समितीने द्यावे, असे मत सेहवागने व्यक्त केले. चहलला संघात स्थान न दिल्याने अनेक दिग्गजांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. सेहवागने देखील प्रश्न उपस्थित केले आहेत.

सेहवागने एक वृत्तसंस्थेला मुलाखत देताना चहलला संघातून डच्चू केल्याच्या निवड समितीच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले. चहल टी-२० मध्ये कोणत्याही संघासाठी सर्वात उपयुक्त गोलंदाज आहे. भारताच्या निवडकर्त्यांनी स्पष्ट केले पाहिजे की त्यांनी या लेग स्पिनरला टी-२० विश्वचषक संघात संधी का दिली नाही. चहल यापूर्वीही चांगली गोलंदाजी करत होता. मला समजत नाही की मग त्याला भारतीय संघात स्थान का मिळाले नाही? असा सवाल सेहवागने उपस्थित केला. राहुल चहरने श्रीलंका दौऱ्यावर खूप चांगली गोलंदाजी केली. चहल ज्या प्रकारे गोलंदाजी करत आहे, तो टी -२० क्रिकेटमधील कोणत्याही संघाची सर्वात मोठी ताकद बनू शकतो, असे सेहवाग म्हणाला.

सेहवाग पुढे म्हणाला की, चहलला टी-२० मध्ये गोलंदाजी कशी करायची, कसे विकेट घ्यायचे याची त्याला कल्पना आहे. जर मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर ग्लेन मॅक्सवेल आणि युजवेंद्र चहलने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला सामना जिंकवून दिला. दोघांनी मधल्या षटकात सलग विकेट घेतल्या आणि यामुळे संपूर्ण सामन्याची स्थिती बदलली. सेहवागच्या आधी हरभजन सिंगनेही चहलची टी-२० विश्व चषक संघात निवड न झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.