Wednesday, March 19, 2025
27 C
Mumbai
Homeक्रीडाChampions Trophy : आयसीसीला उत्तर द्यावे लागेल; उपांत्य फेरीआधी विवियन रिचर्ड्सकडून हा मुद्दा उपस्थित

Champions Trophy : आयसीसीला उत्तर द्यावे लागेल; उपांत्य फेरीआधी विवियन रिचर्ड्सकडून हा मुद्दा उपस्थित

Subscribe

चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे असले तरी भारताने पाकिस्तानात जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे हायब्रीड मॉडेलअंतर्गत ही स्पर्धा खेळवण्यात येत आहे. त्यामुळे इतर संघांना दुबई आणि पाकिस्तान दरम्यान प्रवास करावा लागला. हा प्रवास करताना इतर संघांना अनेकदा लॉजिस्टिक समस्यांचा सामना करावा लागला. त्यामुळे वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेट दिग्गज विवियन रिचर्ड्स यांनीही सामन्याच्या ठिकाणाचा मुद्दा उपस्थित करत आयसीसीवर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानकडे असले तरी भारताने पाकिस्तानात जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे हायब्रीड मॉडेलअंतर्गत ही स्पर्धा खेळवण्यात येत आहे. त्यामुळे इतर संघांना दुबई आणि पाकिस्तान दरम्यान प्रवास करावा लागला. हा प्रवास करताना इतर संघांना अनेकदा लॉजिस्टिक समस्यांचा सामना करावा लागला. अनेक माजी क्रिकेटपटू हा मुद्दा उपस्थित करत आहेत. आताही भारतीय संघाने अंतिम फेरीत धडक मारली तर हा सामना दुबईमध्ये खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेट दिग्गज विवियन रिचर्ड्स यांनीही सामन्याच्या ठिकाणाचा मुद्दा उपस्थित करत आयसीसीवर निशाणा साधला आहे. (Vivian Richards takes aim at ICC for Champions Trophy matches being played in Dubai)

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धा अंतिम टप्प्यात आली आहे. गट अ मधून भारत आणि न्यूझीलंडने उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे, तर गट ब मधून ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. 4 मार्च रोजी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उपांत्य फेरीचा पहिला सामना पार पडणार आहे. तर 5 मार्च रोजी न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्या उपांत्य फेरीचा दुसरा सामना होणार आहे. त्यानंतर दोन्ही उपांत्य फेरीतील विजेते संघ 9 मार्च रोजी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आमनेसामने येतील. परंतु हा सामना पाकिस्तान खेळवण्यात येणार की दुबईमध्ये हे भारताच्या विजयावर अवलंबून असणार आहे. मात्र साखळी फेरीत भारतासोबत सामना खेळण्यासाठी इतर संघांना दुबईमध्ये यावे लागले. यामुळे उद्भवणाऱ्या समस्यांसाठी आयसीसीने जबाबदारी निश्चित करण्याच्या मुद्द्यावर विवियन रिचर्ड्स यांनी प्रश्न विचारला आहे.

माध्यमांशी संवाद साधताना विवियन रिचर्ड्स म्हणाले की, लोकांकडे मांडण्यासाठी स्वतःचे तर्क आहेत. पण मला वाटतं यामागे राजकारण आहे. मला राजकीय दृष्टिकोनातून बोलायचे नाही. पण मला वाटतं की या खेळाचे व्यवस्थापन करणारे लोक म्हणजेच आयसीसी, या सर्व समस्यांसाठी जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांनी याचे उत्तर द्यावे. असे का घडत आहे ते त्यांनी सांगायला हवे, अशी मागणी करत विवियन रिचर्ड्स म्हणाले की, खेळ ही अशी गोष्ट आहे जी सर्वांना एकत्र आणू शकते.

इतर संघांच्या प्रवासावर याआधी प्रश्न उपस्थित

इंग्लंडचे माजी कर्णधार नासेर हुसेन आणि मायकेल आथर्टन यांनीही इतर संघांच्या प्रवासामुळे होणाऱ्या अडचणींबद्दल यापूर्वी प्रश्न उपस्थित केले होते. सुरक्षेच्या कारणास्तव भारताने पाकिस्तानला भेट देण्यास नकार दिला होता. मात्र या स्पर्धेत समान खेळाचे वातावरण सुनिश्चित करण्यात आयसीसी अपयशी ठरल्याची टीका करण्यात येत आहे.