कसोटीत स्वतःला सिद्ध करायचे होते!

जसप्रीत बुमराहचे विधान

Jasprit Bumrah

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून ओळखला जातो. कारकिर्दीच्या सुरुवातीला बुमराह फक्त मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येच चांगली गोलंदाजी करू शकतो असे लोकांना वाटायचे. तसेच गोलंदाजीच्या वेगळ्या शैलीमुळे कसोटी क्रिकेटमध्ये बुमराह यशस्वी होईल का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र, बुमराहने १२ कसोटी सामन्यांमध्ये ६२ बळी घेत बर्‍याच लोकांना चुकीचे ठरवले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये मिळत असलेल्या यशाचा बुमराहला आनंद आहे. मला सुरुवातीपासूनच कसोटी क्रिकेटमध्ये स्वतःला सिद्ध करायचे होते, असे तो म्हणाला.

माझ्यासाठी कसोटी क्रिकेटला विशेष महत्त्व आहे. मला सुरुवातीपासूनच कसोटी क्रिकेट खेळायचे होते आणि स्वतःला सिद्ध करायचे होते. मला केवळ टी-२० आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये खेळायचे नव्हते. मी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली होती आणि तशीच कामगिरी कसोटी क्रिकेटमध्येही करण्याचा मला विश्वास होता. मात्र, आता माझी कारकीर्द सुरु होऊन फार काळ झालेला नाही. मी केवळ १२ कसोटी सामने खेळलो आहे. कसोटी क्रिकेट खेळणे हे माझे स्वप्न होते आणि दोन वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ते पूर्ण झाले. पांढर्‍या गणवेशात खेळताना फार आनंद होतो. तसेच भारतीय संघाच्या यशात योगदान देत असल्याचे समाधान आहे, असे बुमराहने सांगितले. नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत त्याने हॅटट्रिकचीही नोंद केली होती. कसोटी क्रिकेटमध्ये हॅटट्रिक मिळवणारा तो केवळ तिसरा भारतीय गोलंदाज आहे.

भारतात खेळण्यास उत्सुक!

जसप्रीत बुमराहने आतापर्यंत १२ कसोटी सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. परंतु, त्याने अजून भारतात एकही कसोटी सामना खेळलेला नाही. त्यामुळे आगामी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत तो पहिल्यांदा भारतात कसोटी सामना खेळण्यास उत्सुक आहे. माझ्यासाठी प्रत्येक अनुभव महत्त्वाचा आहे. मी रणजी करंडकात भारतामध्ये खूप क्रिकेट खेळलो आहे. त्यामुळे मला लाल चेंडूने भारतात कशी गोलंदाजी करायची हे माहित आहे. मात्र, भारतामध्ये कसोटी क्रिकेट खेळणे वेगवान गोलंदाजांसाठी आव्हानात्मक असते. परंतु, मी भारतात पहिल्यांदा कसोटी सामना खेळण्यास उत्सुक आहे, असे बुमराह म्हणाला.