घरक्रीडापुन्हा क्रिकेट खेळण्याची खात्री नव्हती

पुन्हा क्रिकेट खेळण्याची खात्री नव्हती

Subscribe

इंग्लंडविरुद्धच्या अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा डाव २८४ धावांवर संपुष्टात आला. खराब सुरुवातीनंतर माजी कर्णधार स्टिव्ह स्मिथने झुंजार खेळ करत १४४ धावांची खेळी केली. त्याचा हा जवळपास दीड वर्षांनंतर पहिला कसोटी सामना होता. मागील वर्षी मार्चमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध बॉल टॅम्परिंग प्रकरणातील सहभागामुळे स्मिथवर एका वर्षाची बंदी घालण्यात आली होती. हा काळ स्मिथसाठी खूप कठीण होता. त्यातच यावर्षी जानेवारीमध्ये त्याच्या कोपरावर शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे त्याला पुन्हा क्रिकेट खेळण्याची खात्री नव्हती आणि तो निवृत्तीचाही विचार करत होता.

तो १५ महिन्यांचा काळ माझ्यासाठी खूप अवघड होता. या काळात पुन्हा क्रिकेट खेळण्याबाबत मला खात्री नव्हती. याच दरम्यान माझ्या कोपरावर शस्त्रक्रिया झाली. त्यामुळे माझे क्रिकेटवरील प्रेम थोडे कमी झाले होते. मात्र, मी जेव्हा दुखापतीतून सावरलो, तेव्हा पुन्हा क्रिकेटवर पूर्वी इतकेच प्रेम करू लागलो. त्यावेळी मला अचानक काय झाले माहीत नाही, पण मला पुन्हा क्रिकेट खेळण्याची, ऑस्ट्रेलियासाठी मैदानात उतरण्याची आणि लोकांना माझ्यावर गर्व वाटावा असे काहीतरी करण्याची इच्छा निर्माण झाली. आता मी पुन्हा ऑस्ट्रेलियासाठी खेळत असल्याचा आणि मला सर्वात आवडणारी गोष्ट करत असल्याचा आनंद आहे, असे स्मिथ म्हणाला.

- Advertisement -

स्मिथने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात नवव्या विकेटसाठी पीटर सिडेलसोबत ८८ धावांची, तर नेथन लायनसोबत दहाव्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली. पुनरागमनात शतक करण्याविषयी तो म्हणाला, खरे सांगायचे तर शतक पूर्ण झाल्यावर काय करावे हे मला सुचत नव्हते. मी बराच काळ यासाठी वाट पाहत होतो. संघ अडचणीत असताना मी इतकी चांगली कामगिरी करू शकलो याचा मला आनंद आहे. इंग्लंडने अप्रतिम गोलंदाजी केली. त्यामुळे धावा करणे खूप आव्हानात्मक होते. मात्र, मी झुंज दिली आणि संघासाठी योगदान देऊ शकलो याचा अभिमान आहे. हे माझ्या कारकिर्दीत सर्वोत्तम शतकांपैकी एक आहे. अ‍ॅशेस मालिकेतील पहिला सामना महत्त्वाचा असतो. त्यामुळे मला लवकर बाद व्हायचे नव्हते. आम्ही पहिल्या डावात चांगली धावसंख्या उभारली आहे.

स्मिथ कसोटीतील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक

अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलिया संघ अडचणीत असताना स्टिव्ह स्मिथने शतक झळकावल्यामुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला. भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने ट्विटरवरून स्मिथची स्तुती केली. स्टिव्ह स्मिथचे शतक फारच उत्कृष्ट होते. कठीण परिस्थितीत, तो कसोटीतील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे, असे सेहवागने ट्विटमध्ये लिहिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -