घरक्रीडासदैव सैनिका पुढेच जायचे 

सदैव सैनिका पुढेच जायचे 

Subscribe

वर्ल्ड कप 'क' गटाच्या शनिवारी होणाऱ्या अखेरच्या लढतीत भारत-कॅनडा, बेल्जियम-द.आफ्रिका अशा लढती रंगतील.

सदैव सैनिका पुढेच जायचे…या कवी वसंत बापट यांच्या काव्यपंक्तींची आठवण झाली ती भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांच्या उद्गारांमुळे ! येथील कलिंग स्टेडिअमवर वर्ल्ड कप हॉकी स्पर्धा रंगतदार अवस्थेत सुरु असून पत्रकार परिषदेदरम्यान प्रशिक्षक हरेंद्र सिंग, आता आम्हाला पुढे जायचे आहे, मागचे सारे विसरून आगेकूच करायची आहे असे म्हणाले.
वर्ल्ड कप ‘क’ गटाच्या शनिवारी होणाऱ्या अखेरच्या लढतीत भारत-कॅनडा, बेल्जियम-द.आफ्रिका अशा लढती रंगतील. ‘क’ गटात ४ गुणांसह भारत सरस गोल सरासरीमुळे (+५) अव्वल स्थानावर असून त्यांचा बाद फेरीतील प्रवेश निश्चित आहे. भारतीय युवा खेळाडूंनी शानदार खेळ करून उडीशा हॉकी रसिकांची मने जिंकली आहेत. भारताच्या आधीच्या दोन्ही लढतींना प्रेक्षकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला असून शनिवारी कलिंग स्टेडियमवर ‘चक दे इंडिया’चे नारे घुमतील अशी अटकळ आहे. प्रेक्षकांचा पाठिंबा, शानदार खेळ यामुळे यंदा वर्ल्ड कपमध्ये भावी संघाची कामगिरी उठावदार दिसते. बेल्जियमसारख्या तगड्या प्रतिस्पर्धीला २-२ असे बरोबरीत रोखताना भारताने शानदार खेळ केला. ‘टोटल हॉकी’चा बालक्रिशन यांचा प्रयोग आता जगातील सर्वच नामवंत संघ करत आहेत.
प्रशिक्षक हरेंद्र आपल्या चेल्यांच्या कामगिरीवर खुष आहेत. पण ते अल्पसंतुष्ट नाहीत. आम्हाला अजून खूप मजल मारायची आहे, कॅनडाला आम्ही हलके लेखत नाही. याआधी वर्ल्ड कपमध्ये कॅनडाने भारताला दोनदा नमवले आहे, या जुन्या आठवणी विसरून नव्याने आगेकूच करायचा चंग मनप्रीत आणि त्याच्या सहकाऱ्यांनी बांधला असून आपला ठसा उमटवायचा प्रयत्न युवा हॉकीपटू नक्कीच करतील.
१९७५ मध्ये अजितपाल सिंग यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने क्वाललंपूर येथील वर्ल्ड कप पटकावला होता. त्यानंतर मात्र भारताला वर्ल्ड कपने हुलकावणी दिली आहे. मुंबई (१९८२) आणि सिडनी (१९९२) येथील वर्ल्ड कपमधील पाचवा क्रमांक हीच भारताची वर्ल्ड कपमधील सर्वोत्तम कामगिरी.
यंदा मात्र कलिंग स्टेडिअमवर आपली कामगिरी उंचावण्याचा मनप्रीत आणि त्याच्या सहकाऱ्यांचा प्रयत्न असून प्रेक्षकांचा त्यांना भरघोस पाठिंबा मिळत आहे. स्पर्धेच्या कार्यक्रमानुसार दोन सामन्यांमध्ये ५ दिवसांच्या विश्रांतीमुळे फरक पडतो का असे विचारले असता मनप्रीत म्हणाला, ‘मैदानात खेळण्यास आम्ही उत्सुक असतो, पण मनात बेचैनीही असते. ५ दिवस आम्ही काही स्वस्थ बसलो नव्हतो. २ दिवस धावलो, २ दिवस कसून सराव केला, मानसिकदृष्टया आम्ही सक्षम आहोत.’
प्रशिक्षक हरेंद्र यांना आपल्या खेळाडूंवर भरोसा आहे. कॉलेज असो वा क्लब मी खेळत असताना मंदिर किंवा गुरुद्वाऱ्यात जाऊन प्रार्थना करायचो आणि तो दिनक्रम आजही चालूच आहे. भारतीय खेळाडू यंदाच्या स्पर्धेत चांगली कामगिरी करतील अशीही आशा हरेंद्र यांनी व्यक्त केली.
– शरद कद्रेकर 
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -