IPL 2020 : आम्हाला मलिंगाची उणीव भासेल – रोहित शर्मा

मलिंगा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. 

Malinga and Rohit Sharma
लसिथ मलिंगा आणि रोहित शर्मा  

यंदाच्या आयपीएल स्पर्धेला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. मात्र, ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच गतविजेत्या मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला होता. काही दिवसांपूर्वी, त्यांचा अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने वैयक्तिक कारणांमुळे यंदाच्या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला होता. मलिंगा हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाज असून त्याच्या खात्यात १७० विकेट आहेत. त्यामुळे यंदाच्या मोसमात त्याची उणीव आम्हाला नक्कीच भासेल, असे मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला.

मलिंगा आमचा ‘मॅचविनर’ 

मलिंगाची जागा इतर कोणत्याही खेळाडूने घेणे अवघड आहे. तो मुंबईसाठी अनेकदा मॅचविनर ठरला आहे. आमचा संघ कधीही अडचणीत असेल, आम्हाला विकेटची गरज असेल, तेव्हा मी मलिंगाला गोलंदाजी देतो. तो नेहमीच आम्हाला अडचणीतून बाहेर काढतो. त्याच्या गाठीशी बराच अनुभव आहे. त्याने मुंबईसाठी अविश्वसनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याची उणीव आम्हाला यंदाच्या मोसमात नक्कीच भासेल. आमच्या संघात जेम्स पॅटिन्सन, धवल कुलकर्णी, मोहसीन खान असे गोलंदाज आहेत, जे मलिंगाच्या जागी खेळू शकतील. मात्र, त्यांच्याकडून मलिंगासारख्या कामगिरीची अपेक्षा करणे चुकीचे ठरेल, असे रोहितने नमूद केले.

यंदाही सलामीवीर म्हणूनच खेळणार

आयपीएलच्या मागील मोसमात रोहितने सलामीवीराची भूमिका पार पाडली होती आणि यंदाही तो सलामीवीर म्हणूनच खेळणार आहे. मी सुरुवातीला सलामीवीर म्हणूनच खेळणार आहे. मात्र, गरज पडल्यास मी माझा क्रमांक बदलू शकतो. संघाच्या हितासाठी काहीही करण्याची माझी तयारी आहे. भारतासाठी खेळतानाही मी संघ व्यवस्थापनाला हेच सांगतो. मी सलामीवीर म्हणून खेळत असलो, तरी माझी कोणत्याही क्रमांकावर खेळण्याची तयारी असते, असेही रोहितने सांगितले.