घरक्रीडाप्रीमियर लीग : वेस्ट हॅमची चेल्सीवर मात

प्रीमियर लीग : वेस्ट हॅमची चेल्सीवर मात

Subscribe

वेस्ट हॅमने इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये चेल्सीला ३-२ असा पराभवाचा धक्का दिला.

अँड्रिय यार्मोलेन्कोने सामना संपायला काहीच मिनिटे शिल्लक असताना केलेल्या गोलमुळे वेस्ट हॅमने इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये चेल्सीला ३-२ असा पराभवाचा धक्का दिला. दोन्ही संघांना हा सामना जिंकणे वेगवेगळ्या कारणांसाठी महत्त्वाचे होते. या सामन्याआधी वेस्ट हॅमचा संघ प्रीमियर लीगच्या गुणतक्त्यात १७ व्या स्थानी होती. त्यामुळे पुढील वर्षीही या स्पर्धेत खेळत राहण्यासाठी वेस्ट हॅमला त्यांच्या कामगिरीत सुधारणा करणे गरजेचे होते आणि ते त्यांनी केले. दुसरीकडे चेल्सीच्या बचावफळीला चांगला खेळ करता आला नाही. त्यामुळे त्यांचा पराभव झाला.

३२ सामन्यांत आठवा विजय

या सामन्याच्या सुरुवातीला चेल्सीने आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांना गोलच्या फारशा संधी मिळाल्या नाहीत. अखेर ४२ व्या मिनिटाला चेल्सीला पेनल्टी मिळाली. यावर विलियानने गोल करत आपल्या संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, ही आघाडी फारकाळ टिकू शकली नाही. वेस्ट हॅमच्या टोमास सुचेकच्या गोलमुळे मध्यंतराला सामन्यात १-१ अशी बरोबरी होती. त्यानंतर ५१ व्या मिनिटाला मिकेल अँटोनियाने गोल करत वेस्ट हॅमला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, विलियान उत्कृष्ट फ्री-किक मारत आपला आणि चेल्सीचा दुसरा गोल केला. त्यामुळे सामन्यात २-२ अशी बरोबरी झाली. अखेर ८९ व्या मिनिटाला यार्मोलेन्कोने गोल करत वेस्ट हॅमला सामना जिंकवून दिला. हा वेस्ट हॅमचा ३२ सामन्यांत आठवा विजय होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -