पाकिस्तानात अखेर क्रिकेट मालिका होणार, डिसेंबरचे वेळापत्रक ठरले

PCB vs WI

जगभरातून अनेक देश पाकिस्तान दौरा रद्द करत असतानाच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला दिलासा देणारे वृत्त समोर आले आहे. न्यूझीलंड पाठोपाठ इंग्लंडच्या संघाने पाकिस्तान दौरा रद्द केल्याने पाकिस्तानातील आगामी मालिकांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्याचा परिणाम आगामी मालिकांवरही पडणार असेच चित्र निर्माण झालेले असतानाच वेस्टइंडिज क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानला दिलासा देणारी अशी माहिती जारी केली आहे. पाकिस्तानात येत्या दिवसांमध्ये असणाऱ्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी आमचा संघ नक्कीच खेळायला येईल. डिसेंबरचा दौरा हा पाकिस्तानने नियोजित केलेल्या कार्यक्रमानुसारच होईल असे वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे. (West Indies confirmed pakistan tour in december amid security concerns)

पाकिस्तानातील सुरक्षेच्या मुद्द्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने रावळपिंडीतला सामना काही तास आधी रद्द केला. त्यापाठोपाठच इंग्लंड क्रिकेट संघानेही महिला आणि पुरूष अशा दोन्ही संघाचा दौरा रद्द करत असल्याचे स्पष्ट केले. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने या दोन्ही संघाचा दौरा रद्द झाल्याने मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली. तसेच इंग्लंड क्रिकेट बोर्डावर आणि न्यूझीलंड क्रिकेट बोर्डांना दोषी ठरवले होते. त्याचवेळी अनेक खेळाडूंनी आयपीएल खेळण्यासाठी खेळाडू कसे काय उपलब्ध होतात ? असाही प्रश्न केला होता.

आता पाकिस्तानला वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाकडून खूपच अपेक्षा आहेत. वेस्ट इंडिज क्रिकेटने आगामी डिसेंबर महिन्यात नियोजित वेळापत्रकानुसारच दौरा होईल, असे स्पष्ट केले आहे. या दौऱ्याच्या अनुषंगाने सगळी तयारी सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले. पाकिस्तानात अनेक वर्षांनंतर क्रिकेटच्या मालिकांना सुरूवात होत आहे. वेस्ट इंडिजने याआधी तीन वर्षांपूर्वी पाकिस्तान दौरा केला होता. येत्या डिसेंबर महिन्यात होणाऱ्या दौऱ्याच्या निमित्ताने पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघात तीन एकदिवसीय सामने आणि तीन टी २० सामने होणार आहेत. वेस्ट इंडिज क्रिकेटचे अधिकारी जॉनी ग्रेव यांनी दौऱ्याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे.


हेही वाचा – भारत दौऱ्याला कोणी नकार देईल का ? ख्वाजाचे पाकिस्तान प्रेम उफाळून आले