घरक्रीडादुबळ्या विंडीजला पुनरागमनाची संधी

दुबळ्या विंडीजला पुनरागमनाची संधी

Subscribe

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरूवात होणार आहे. पहिला सामना गमावला असला तरी वेस्ट इंडिजला या सामन्यात विजय मिळवत २ सामन्यांची मालिका बरोबरीत संपवण्याची संधी आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला शुक्रवारपासून सुरूवात होणार आहे. पहिली कसोटी भारताने १ डाव आणि २७२ धावांनी जिंकल्यामुळे दुसऱ्या कसोटीतही भारताचे पारडे जड मानले जात आहे. पण दुखापतीमुळे पहिल्या कसोटीला मुकलेला कर्णधार जेसन होल्डर आणि किमार रोचच्या पुनरागमनामुळे विंडीज संघाची ताकद वाढणार आहे. भारत वेगवान गोलंदाज उमेश यादवच्या बदली शार्दूल ठाकूरला संघात स्थान देण्याची शक्यता आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजला या सामन्यात विजय मिळवत २ सामन्यांची मालिका बरोबरीत संपवण्याची संधी आहे.

उमेशऐवजी शार्दूलला संघात स्थान मिळण्याची शक्यता

कसोटी मालिकेच्या पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा १ डाव आणि २७२ धावांनी पराभव केला. हा भारताच्या कसोटी इतिहासातील सर्वात मोठा विजय होता. भारताचे फलंदाज आणि गोलंदाज या दोघांनीही या सामन्यात चांगले प्रदर्शन केले होते. भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉने पदार्पणातच शतक झळकावले होते. त्यालाच सामनावीराचा खिताब मिळाला होता. त्याच्यासोबत कर्णधार विराट कोहली आणि रविंद्र जडेजा यांनीही शतके केली होती. चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंत यांनीही चांगली फलंदाजी केली होती. तर गोलंदाजीत उमेश यादव वगळता सगळ्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. त्यामुळे दुसऱ्या कसोटीत उमेश यादवऐवजी मुंबईकर शार्दूल ठाकूरला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. शार्दूलचा इंग्लंड दौऱ्यातही भारताच्या चमूत समावेश होता. पण त्याला एकाही सामन्यात संधी मिळाली नव्हती. आता या सामन्यात शार्दूलला पदार्पणाची संधी मिळू शकते.

होल्डर-किमार रोचच्या पुनरागमनामुळे विंडीजची ताकद वाढणार

दुसरीकडे कर्णधार जेसन होल्डरविना खेळणाऱ्या वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी पहिल्या कसोटी सामन्यात अतिशय खराब प्रदर्शन केले होते. भारताच्या फलंदाजांसमोर विंडीजचे गोलंदाज हतबल दिसले. तर त्यांच्या फलंदाजांनी पहिल्या डावात १८१ आणि दुसऱ्या डावात १९६ धावच केल्या. पण भारतात खेळण्याचा फारसा अनुभव नसणाऱ्या विंडीजच्या फलंदाजांनी पहिल्या डावाच्या तुलनेत दुसऱ्या डावात चांगला खेळ केला. त्यांचा सलामीवीर किरन पॉवेलने दुसऱ्या डावात आक्रमक ८३ धावा केल्या. तर रॉस्टन चेस यानेही दोन्ही डावात चांगली फलंदाजी केली. कर्णधार जेसन होल्डर आणि प्रमुख गोलंदाज किमार रोचच्या पुनरागमनामुळे वेस्ट इंडिजच्या संघात मोठा फरक पडेल. होल्डर आपल्या ‘अष्टपैलू’ खेळामुळे सामना वेस्ट इंडिजकडे फिरवण्यात सक्षम आहे. तर रोच आणि शॅनन गेब्रियल या वेगवान गोलंदाजांच्या जोडगोळीने मागील १ वर्षात चांगले प्रदर्शन केले आहे. त्यामुळे या दोघांच्या पुनरागमनामुळे मनोबल वाढलेला विंडीज संघ हा सामना जिंकून मालिका बरोबरीत संपवणार का हे पाहणे औसूक्त्याचे ठरणार आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -