Thursday, August 5, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर क्रीडा WI vs AUS : फिंचला दुखापत; पहिल्या वनडेसाठी ऑस्ट्रेलियाने केली नव्या कर्णधाराची...

WI vs AUS : फिंचला दुखापत; पहिल्या वनडेसाठी ऑस्ट्रेलियाने केली नव्या कर्णधाराची निवड

वनडे मालिकेतील पहिला सामना बुधवारी खेळला जाईल.

Related Story

- Advertisement -

वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेचे तिन्ही सामने बार्बाडोस येथे होणार असून पहिला एकदिवसीय सामना बुधवारी खेळला जाईल. परंतु, एकदिवसीय मालिकेपूर्वीच ऑस्ट्रेलियाला धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंच उजव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे पहिल्या एकदिवसीय सामन्यात खेळू शकणार नाही. तसेच पुढील दोन सामन्यांतील त्याच्या उपलब्धतेचा निर्णय नंतर घेण्यात येणार असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून सांगण्यात आले आहे. त्याच्या अनुपस्थितीत यष्टीरक्षक-फलंदाज अ‍ॅलेक्स कॅरीची ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदी निवड झाली आहे.

ऑस्ट्रेलियाचा २६ वा कर्णधार

ऑस्ट्रेलियाचा नियमित उपकर्णधार पॅट कमिन्स, तसेच स्टिव्ह स्मिथ आणि डेविड वॉर्नर यांसारखे प्रमुख अनुभवी खेळाडू विंडीज दौऱ्यावर गेलेले नाहीत. त्यामुळे फिंचच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाला नव्या कर्णधाराची निवड करावी लागली आहे. अ‍ॅलेक्स कॅरी ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघाचा एकूण २६ वा कर्णधार ठरेल. ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद भूषवणे ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचे कॅरी म्हणाला. कॅरीने याआधी ऑस्ट्रेलिया ‘अ’, बिग बॅश लीगमध्ये अ‍ॅडलेड स्ट्रायकर्स, ऑस्ट्रेलियन स्थानिक क्रिकेटमध्ये दक्षिण ऑस्ट्रेलिया या संघाचे नेतृत्व केले आहे.

विंडीजचे पारडे जड

- Advertisement -

ऑस्ट्रेलियाच्या विंडीज दौऱ्याची सुरुवात टी-२० मालिकेने झाली होती. ऑस्ट्रेलियाने ही टी-२० मालिका १-४ अशा मोठ्या फरकाने गमावली. त्यातच आता एकदिवसीय मालिकेतही ऑस्ट्रेलियाचे बरेचसे प्रमुख खेळाडू खेळणार नसल्याने विंडीजचे पारडे जड मानले जात आहे. या मालिकेत जॉश फिलिपे, बेन मॅकडरमोट आणि रायली मेरेडीच यांसारख्या खेळाडूंना एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळू शकेल.

- Advertisement -