घरक्रीडापराभव झाला तर काय, मला संघाचा अभिमान!

पराभव झाला तर काय, मला संघाचा अभिमान!

Subscribe

गोलंदाजांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे इंग्लंडने अ‍ॅशेस मालिकेतील पाचव्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा १३५ धावांनी पराभव केला. इंग्लंडने हा सामना जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियासमोर ३९९ धावांचे आव्हान ठेवले होते. याचा पाठलाग ऑस्ट्रेलियाला २६३ धावाच करता आल्या. त्यामुळे इंग्लंडने हा सामना जिंकत या मालिकेत २-२ अशी बरोबरी केली. मात्र, ऑस्ट्रेलियाने मागील अ‍ॅशेस मालिका जिंकल्याने त्यांना अ‍ॅशेस अर्न आपल्याकडे राखण्यात यश आले. या सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने आपल्या संघाची स्तुती केली.

आम्ही अर्न आमच्यासोबत ऑस्ट्रेलियाला घेऊन जात आहोत आणि हेच करण्याचे आमचे लक्ष्य होते. आम्ही अर्न आमच्याकडे राखू शकलो याचा आनंद आहे. आम्ही पाचव्या सामन्यात चांगला खेळ करू शकलो नाही याचे नक्कीच दुःख आहे. मात्र, आमचा संघ या मालिकेत ज्याप्रकारे खेळला त्याचा अभिमान आहे. ऑस्ट्रेलियन खेळाडूंसाठी इंग्लंडमध्ये येऊन खेळणे आणि जिंकणे फार आव्हानात्मक असते. आम्ही दोन सामने सहजपणे जिंकलो. तिसरा सामनाही (हेडिंग्ली येथे झालेले) आम्ही जिंकायला हवा होता, पण अखेरच्या क्षणी आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ करू शकलो नाही, असे पेनने सांगितले.

- Advertisement -

ऑस्ट्रेलियाने या मालिकेची दमदार सुरुवात केली होती. त्यांनी एजबॅस्टन येथे झालेला पहिला सामना २५१ धावांनी जिंकला होता. तो सामना जिंकल्यामुळे संघाचा आत्मविश्वास वाढला असे पेनला वाटते. एजबॅस्टनच्या मैदानावर इंग्लंडला पराभूत करणे फार अवघड असते आणि ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकूच शकणार नाही असे म्हटले जात होते. त्यामुळे तो सामना इतक्या मोठ्या फरकाने जिंकल्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला. आम्ही या मालिकेत उत्तम कामगिरी करू असा विश्वास वाटू लागला, असे पेन म्हणाला.

इंग्लंडने झुंजार खेळ केला -रुट

- Advertisement -

ऑस्ट्रेलियाने चौथा सामना जिंकत अ‍ॅशेस मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली होती. त्यामुळे या मालिकेत बरोबरी करण्यासाठी इंग्लंडला पाचवा सामना जिंकणे अनिवार्य होते. आमच्या सर्व खेळाडूंनी झुंजार खेळ केल्यामुळे आम्ही हा सामना जिंकू शकलो, असे विधान इंग्लंडचा कर्णधार जो रुटने सामन्यानंतर केले. हे अ‍ॅशेस क्रिकेट आहे. तुम्ही तुमच्या देशासाठी खेळत असता. त्यामुळे तुम्ही प्रत्येक सामन्यात सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करता. आमच्या प्रत्येक खेळाडूने वेगवेगळ्या क्षणी आपला खेळ उंचावला. आम्ही खेळाडूंनी झुंजार खेळ केला. त्यामुळेच आम्ही ही मालिका बरोबरीत संपवू शकलो, असेही रुट म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -