घरक्रीडाकुठे गेली कांगारूंची दहशत?

कुठे गेली कांगारूंची दहशत?

Subscribe

विश्वचषक स्पर्धेत आजवर सर्वाधिक पाच वेळा जेतेपद पटकावणार्‍या ऑस्ट्रेलियाने इतरही आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये दबदबा निर्माण केला होता. यामुळेच की काय कांगारूंच्या प्रतिस्पर्ध्यांना प्रत्येक सामन्यात खेळताना धडकी भरायची. रिकी पॉन्टिंग, हेडन, अ‍ॅडम गिलख्रिस्ट, सायमंड्स, ग्लेन मॅकग्रा, शेन वॉर्न, जेसन गिलेस्पी अशी एक ना अनेक नावे आजही क्रिकेटप्रेमींच्या डोळ्यासमोर उभी राहतात. त्यांच्या अनेक खेळी क्रिकेट चाहत्यांसाठी अविस्मरणीय आहेत. मात्र, गेल्या काही वर्षांपासून कांगारूंची ही दहशत कमी झाल्याचे मागील अनेक सामन्यांचा निकाल पाहता स्पष्ट होत आहे.

ऑस्ट्रेलियन संघातील दर्जेदार खेळाडूंची निवृत्ती, वादाची अनेक प्रकरणे आणि मधल्या फळीतील फलंदाजांना सातत्याने येणारे अपयश ही कारणे प्रकर्षाने जाणवतात. यंदाच्या विश्वचषकावरच नजर फिरवल्यास कांगारूंचे हे अपयश पुन्हा सिद्ध होत आहे. अफगाणिस्तान, वेस्ट इंडिजविरुद्ध ऑस्ट्रेलियाने सामने जिंकले असले, तरी त्यांच्या लौकिकास साजेसा खेळ करण्यात त्यांना अपयशच आलेले दिसून येते. भारताविरूद्धही ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीतील फलंदाजांना अपयशच आले.

- Advertisement -

अफगाणिस्तानविरुद्ध ऑस्ट्रेलियासमोर २०७ धावांचे माफक आव्हान होते, तरीदेखील त्यांना तीन गडी गमवावे लागले. या सामन्यात पहिल्या जोडीने दमदार सुरुवात करून दिल्यानंतरही ऑस्ट्रेलियाला अखेरीस शर्थीचे प्रयत्न करावे लागले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातही स्टिव्ह स्मिथ आणि नेथन कुल्टर-नाईल वगळता ऑस्ट्रेलियाच्या इतर फलंदाजांना क्षमतेनुसार फलंदाजीत योगदान देता आले नाही. यामुळेच ४९ षटकांत कांगारूंना २८८ धावांपर्यंतच मजल मारता आली. वेस्ट इंडिजविरोधात पंचांनी काही चुकीचे निर्णय दिल्याने, तसेच काही विंडिज फलंदाजांना अखेरीस तग धरता न आल्याने कसेबसे कांगारू जिंकले. मात्र, ज्या बलाढ्य ऑस्ट्रेलियाकडे जगभरातील क्रिकेटप्रेमी अपेक्षेने बघतात, त्यांच्याकडून लौकिकास साजेसा खेळ आता बघावयास मिळत नसल्याचे प्रत्येक सामन्यात जाणवते. भारताविरुद्धही ऑस्ट्रेलियाच्या संघाला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही.

या सामन्यात एक-दोन फलंदाज वगळता ऑस्ट्रेलियन खेळाडूंना सामना वाचवता आला नाही. खरे पाहता गिलख्रिस्ट, हेडन, पॉन्टिंग अशा अनेक प्रोफेशनल क्रिकेटपटूंचा भरणा असलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचे नाव ऐकले तरी प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरायची. त्यांचा काळ आजही प्रत्येक क्रिकेटपटूंसह चाहत्यांच्या स्मरणात आहे. मात्र, आजचा ऑस्ट्रेलियन संघ काहीसा कमकूवत जाणवतो. संघात अनुभवी फलंदाजांची कमी, सामना जिंकवणाची क्षमता असणारे खेळाडू कमी, अंतर्गत वाद अशा अनेक कारणांमुळे ऑस्ट्रेलियन संघ पिछाडीवर पडला असल्याचे म्हणता येईल.

- Advertisement -

या संघाला आता पुन्हा वैभव मिळवून देण्यासाठी प्रत्येक खेळाडूला आपल्या क्षमतेपेक्षा अधिक चांगले योगदान देणे गरजेचे झाले आहे. तसे झाले तरच पुन्हा अव्वल क्रमांकाला कांगारूंचा संघ विराजमान होऊ शकेल. जगभरातील क्रिकेटप्रेमींनाही या संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. यासाठी सध्याच्या संघाची मदार असलेल्या वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, अ‍ॅरॉन फिंच, मिचेल स्टार्क या अनुभवी खेळाडूंवर आहे. त्यांना आपला सर्वोत्तम खेळ करावा लागणार आहे. जेणेकरून यंदाच्या विश्वचषकात कांगारूंचा संघ अंतिम सामन्यात धडक मारू शकेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -