घरक्रीडा४००ची धावसंख्या आहे कुठे?

४००ची धावसंख्या आहे कुठे?

Subscribe

इंग्लंडमध्ये सुरू असलेला क्रिकेट विश्वचषक जिंकण्यासाठी यजमानांना प्रमुख दावेदार मानले जात होते. मात्र, ७ पैकी ३ सामने गमावल्यामुळे इयॉन मॉर्गनचा इंग्लंड संघ उपांत्य फेरी गाठण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. त्यांना मागील दोन सामन्यांत श्रीलंका आणि पारंपरिक प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलियाने पराभूत केले. तसेच इंग्लंडच्या संघाने मागील ३-४ वर्षांत अनेकवेळा ३५०-४०० ची धावसंख्या गाठली होती.

मागील वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांनी विक्रमी ४८१ धावा केल्या होत्या. त्यामुळे ते या विश्वचषकात ४०० किंवा अगदी ५०० चीही धावसंख्या उभारु शकतील अशी चर्चा होती, पण तसे झालेले नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने इंग्लंडच्या संघावर निशाणा साधला आहे.

- Advertisement -

इंग्लंडचा संघ विश्वचषकाआधी ४०० च्या धावसंख्येबद्दल बरीच बडबड करत होता. ते इतकी मोठी धावसंख्या उभारतील असा त्यांना विश्वास होता. मात्र, ४०० ची धावसंख्या आहे कुठे? या विश्वचषकात मोठ्या धावसंख्या उभारल्या जाणार नाहीत, असे मी आणि ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टिन लँगर ही स्पर्धा सुरू होण्याआधीच म्हणालो होतो. मागील काही वर्षांत इंग्लंडने द्विपक्षीय मालिकांमध्ये मोठ्या धावसंख्या केल्या आहेत, पण द्विपक्षीय मालिका आणि विश्वचषक यामध्ये खूप फरक आहे. विश्वचषकात संघांवर वेगळाच दबाव असतो, असे पॉन्टिंग म्हणाला.

इंग्लंडने मागील (२०१५) विश्वचषकानंतर आक्रमक पद्धतीने खेळण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यांना बरेच यश मिळाले होते. मात्र, हाच आक्रमक खेळ इंग्लंडसाठी या स्पर्धेत घातक ठरत आहे असे पॉन्टिंगला वाटते. इंग्लंडला उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारत आणि न्यूझीलंडविरुद्धचे सामने जिंकणे महत्त्वाचे आहे. त्यांना हे सामने जिंकण्यासाठी आपल्या खेळात सुधारणा करावी लागेल, असे पॉन्टिंग म्हणाला.

- Advertisement -

पाकिस्तानचा सामना पाकिस्तानशीच!

विश्वचषकातील ५ पैकी केवळ १ सामना जिंकण्यात यश आल्यामुळे पाकिस्तानचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले, असे मत क्रिकेट समीक्षकांनी व्यक्त केले होते. मात्र, त्यानंतर त्यांनी सलग २ दोन सामने जिंकत दमदार पुनरागमन केले. त्यामुळे त्यांना अजूनही उपांत्य फेरी गाठण्याची संधी आहे, पण पाकिस्तान उपांत्य फेरी गाठणार का हे सांगणे अवघड आहे, असे रिकी पॉन्टिंग म्हणाला. पाकिस्तानच्या संघामध्ये कोणत्याही संघाचा पराभव करण्याची क्षमता आहे. मात्र, ते कोणत्याही संघाकडून पराभूतही होऊ शकतात. त्यामुळे पाकिस्तानचा सामना इतर संघांशी नाही, तर पाकिस्तानशीच असतो. त्यांच्याबाबत कोणतेही भाकीत करणे अवघड आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -