कोणाचे अनुकरण करायला आवडत नाही, पण कोहलीचे नक्कीच करेन !

इंग्लंडचा फलंदाज ऑली पोप

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो. त्याच्या कामगिरीतील सातत्यामुळेच तो भारतातील अनेक तरुण खेळाडूंचा आदर्श आहे. त्याचे हे खेळाडू अनुकरण करतात, मात्र यात आता एका परदेशी खेळाडूचाही समावेश झाला आहे. हा खेळाडू आहे इंग्लंडचा ऑली पोप. मला कोणाचे अनुकरण करायला आवडत नाही, पण मी विराट कोहलीचे अनुकरण नक्कीच करेन, असे पोप म्हणाला. पोपने मागील वर्षी भारताविरुद्ध इंग्लंडमध्ये झालेल्या कसोटी मालिकेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यावेळी त्याला भारतीय कर्णधाराला खेळताना पहायची थेट मैदानातच संधी मिळाली होती.

मी अगदी खरे सांगू तर मला कोणाचे अनुकरण करायला आवडत नाही, पण मी विराट कोहलीचे अनुकरण नक्कीच करेन. तो नॉटिंगहॅम कसोटीमध्ये ज्याप्रकारे खेळला ते पाहून मी थक्कच राहिलो होतो. त्या सामन्यात चेंडू खूप स्विंग करत होता. त्यासाठी तो क्रिजबाहेर उभा राहिला आणि त्याने स्विंग खेळण्याचे जे तंत्र वापरले ते मैदानातच पाहणे खूपच खास होते. मला त्याला खेळताना पाहून खूप काही शिकायला मिळाले, असे पोपने सांगितले.

इंग्लंडविरुद्ध नॉटिंगहॅम येथे झालेल्या कसोटीमध्ये कोहलीने पहिल्या डावात ९७ आणि दुसर्‍या डावात १०३ धावा काढल्या होत्या. त्याच्या या दमदार कामगिरीमुळे भारताने हा सामना जिंकला होता.