घरक्रीडामेस्सी नाही, रोनाल्डो सर्वात भारी!

मेस्सी नाही, रोनाल्डो सर्वात भारी!

Subscribe

पोर्तुगालचा क्रिस्तिआनो रोनाल्डो आणि अर्जेंटिनाचा लिओनेल मेस्सी या दोघांपैकी सर्वोत्तम फुटबॉलपटू कोण याबाबत चर्चा, वादविवाद वर्षानुवर्षे सुरू आहे. सर्वोत्तम फुटबॉलपटूला मिळणारा ‘बॅलन डी ओर’ हा पुरस्कार रोनाल्डो आणि मेस्सी या दोघांनाही प्रत्येकी ५ वेळा मिळाला आहे. व्यावसायिक फुटबॉलमध्ये मेस्सी सुरुवातीपासून बार्सिलोना संघाकडून खेळत आहे, तर रोनाल्डो स्पोर्टींग लिस्बन, मँचेस्टर युनायटेड, रियाल माद्रिद आणि ज्युव्हेंटस अशा विविध संघांकडून खेळला आहे. रोनाल्डोने विविध देशांच्या लीगमध्ये जाऊन खेळण्याचे आव्हान स्वीकारल्यामुळेच तो जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटू आहे, असे मत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि फुटबॉलचा मोठा चाहता असणार्‍या विराट कोहलीने व्यक्त केले.

माझ्या मते रोनाल्डो हा सर्वोत्तम फुटबॉलपटू आहे. त्याच्या इतकी मेहनत कोणी दुसरा खेळाडू घेतो, असे मला वाटत नाही. त्याला प्रत्येक सामना जिंकायचा असतो आणि हे तो ज्याप्रकारे खेळतो त्यातून दिसून येते. मी त्याचा चाहता असल्याने तो ज्या संघाकडून खेळतो, त्या संघाला मी पाठिंबा देतो. त्याच्याकडून मला खूप प्रेरणा मिळते. रोनाल्डोने त्याच्या कारकिर्दीत मेस्सीपेक्षा जास्त आव्हाने स्वीकारली आहेत आणि त्याला खूप यशही मिळाले आहे. रोनाल्डो हा मी पाहिलेला सर्वात परिपूर्ण फुटबॉलपटू आहे. त्याच्याकडून लोकांना प्रेरणा मिळते, जी फारशा इतर खेळाडूंकडून मिळत नाही. तो एक उत्कृष्ट कर्णधार आहे आणि ही गोष्ट मला आवडते. त्याचा स्वतःच्या क्षमतेवर खूप विश्वास आहे, असे कोहलीने फिफाच्या संकेतस्थळाला सांगितले.

- Advertisement -

भारत नक्कीच फुटबॉल वर्ल्डकपमध्ये खेळेल

भारतीय फुटबॉलने मागील काही वर्षांत खूप प्रगती केली आहे. याचे श्रेय विराट कोहलीने सुनील छेत्रीला दिले. तसेच भारत पुढील काही वर्षांत नक्कीच फुटबॉल विश्वचषकात खेळेल, असे त्याला वाटते. याबाबत तो म्हणाला, भारताच्या फुटबॉल संघाने मागील तीन-चार दशकांमध्ये खूप प्रगती केली आहे. आता आपल्याकडे युवा, प्रतिभावान खेळाडू तयार होत आहेत. त्यामुळे आपला संघ नक्कीच विश्वचषकात खेळेल, असे मला वाटते. आपला कर्णधार सुनील छेत्री खूप उत्तम पद्धतीने संघाचे नेतृत्त्व करत आहे. त्याच्यासाठी भारताने एकदा तरी विश्वचषकात खेळावे, अशी माझी इच्छा आहे. तो एक चॅम्पियन खेळाडू आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -